`फाळणीच्यावेळी मुस्लिम पाकिस्तानात गेले असते तर हे दिवस पाहायला लागले नसते`

हा देश जितका आमचा आहे तितकाच तुमचाही आहे, अशी ग्वाही महात्मा गांधींनी आम्हाला दिली होती.
लखनऊ: महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, मौलाना आझाद, सरदार पटेल या नेत्यांनी सांगितल्यामुळेच आमचे पूर्वज भारतात थांबले. मात्र, आज देशात मुस्लिमांना मिळत असलेली वागणूक योग्य आहे का, असा सवाल समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी उपस्थित केला. ते सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
उत्तर प्रदेशच्या शामली येथील समाजवादी पक्षाचे आमदार नाहिद हसन यांचा एक व्हीडिओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हीडिओत नाहिद हसन लोकांनी भाजपशी संबंधित असलेल्या व्यापाऱ्यांकडून खरेदी करू नये, असे आवाहन करताना दिसत आहे. यावरूनच बराच गदारोळ निर्माण झाला होता.
यासंदर्भात माध्यमांनी आझम खान यांना विचारणा केली असता त्यांनी म्हटले की, ही परिस्थिती का उद्भवली? हे सगळे कोणी सुरु केले? आम्ही भारतात थांबलो आहोत, आमचे पूर्वजही थांबले होते. महात्मा गांधी, मौलाना आझाद, सरदार पटेल आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या आग्रहामुळे पाकिस्तानात पळून जाणारे मुस्लिम भारतात थांबले.
महात्मा गांधी यांनी तर हा देश जितका आमचा आहे तितकाच तुमचाही आहे, अशी ग्वाही आम्हाला दिली होती. मात्र, आता आम्हाला कशाप्रकारची वागणूक दिली जात आहे? 'तुम्हारा स्थान कबरीस्तान या पाकिस्तान', अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे आझम खान यांनी सांगितले.
आझम खान यांनी काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीमध्ये यासंदर्भात वक्तव्य केले होते. मुसलमान १९४७ नंतर देखील शिक्षा भोगत आहे. जर फाळणीच्या वेळेस मुसलमान पाकिस्तानात गेले असते, तर त्यांना ही शिक्षा भोगावी लागली नसती. मुसलमान भारतात असल्यामुळे त्यांना शिक्षा भोगावी लागत असल्याचे त्यांनी म्हटले होते.