अजब : ४०० वटवाघुळांसोबत राहणारी महिला
निपाह वायरसचा धोका समोर आल्यानंतरही या महिलेला या वटवाघुळांपासून वेगळं राहण्याची कल्पना पटत नाहीय. ही महिला वटवाघुळांना आपलं कुटुंब मानतेय.
अहमदाबाद : संपूर्ण देशभर निपाह वायरसची दहशत पसरलेली असताना एक महिला मात्र वटवाघुळांसोबत राहतेय. मिळालेल्या माहितीनुसार, महिला आपल्या दोन खोल्यांच्या घरात तब्बल ४०० वटवाघुळांसोबत राहतेय. निपाह वायरसचा धोका समोर आल्यानंतरही या महिलेला या वटवाघुळांपासून वेगळं राहण्याची कल्पना पटत नाहीय. ही महिला वटवाघुळांना आपलं कुटुंब मानतेय.
गुजरातची बॅट वुमन
मिळालेल्या माहितीनुसार, ७४ वर्षांची या महिलेचं नाव शांताबेन प्रजापती आहे. ती अहमदाबादपासून जवळपास ५० किमी दूर असलेल्या राजपूर गावाची रहिवासी आहे. वटवाघुळांसोबत राहत असल्यानं या महिलेला 'बॅट वुमन' म्हणूनही ओळखलं जातं. गेल्या १० वर्षांपासून आपण वटवाघुळांसोबत राहत आहोत आणि निपाह वायरसला मी घाबरत नाही, असं त्यांनी म्हटलंय.
शांताबेन यांच्या घरातील प्रत्येक कोपऱ्यात वटवाघळं चिकटलेली दिसतात. घरातील घाणेरडा वास टाळण्यासाठी त्या दिवसांतून दोन वेळा कापूर जाळतात... आणि बादल्या भरून वटवाघळांची लीदही जमा करतात. वटवाघळं बाजुच्याही घरात वास्तव्याला आली होती, पण त्यांनी मात्र केमिकल ट्रिटमेंटनं त्यांना पळवून लावलं... पण मला मात्र असं करायचं नाहीय... असंही त्या म्हणतात.
उल्लेखनीय म्हणजे निपाह वायरसनं १९ मे रोजी पहिला मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं. हा वायरस आत्तापर्यंत १२ जण बळी पडलेत. वटवाघळांमुळे हा वायरस फैलावत असल्याचंही समोर येतंय.