कोरोना : १०० वर्षे जुनी लस आज ठरतेयं प्रभावी
शंभर वर्षांपूर्वी तयार केलेली लस मदतीला
नवी दिल्ली : कोरोनाचे संकट जगावर घोंघावतंय. प्रत्येक देश यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करतोय. यावर ठोस उपचार नसल्याने खबरदारीचा उपाय म्हणून लॉकडाऊन जारी करण्यात आले आहे. कोरोनावर पूर्णपणे मात करणारी लस सध्या तरी उपलब्ध नाही. जगभरात यावर संशोधन सुरु आहे. यामध्ये एक आशेचा किरण दिसू लागला आहे. कोरोना संकटातून बाहेर पडण्यासाठी शंभर वर्षांपूर्वी तयार केलेली लस मदतीला आली आहे. टीबीसाठी बनवली ही लस वैज्ञानिक कोरोनावर मात करण्यासाठी वापरत आहेत.
बीसीजीकडून आशेचा किरण
गेल्या चार महिन्यांपासून कोरोनावर उपचार शोधले जात आहेत. टीबीपासून वाचण्यासाठी बीसीजी लस वापरली जाते. हीच लस वापरली असता अन्य देशांच्या तुलनेत कोरोनाचा प्रसार कमी झाल्याचे पाहायला मिळाले. पण कोरोना पॉझिटीव्ह व्यक्तींवर या लसीचा फारसा प्रभाव दिसला नाही. ज्यांना टीबीमुक्ततेसाठी ही लस देण्यात आली आहे त्यांच्यावर कोरोनाचा प्रभाव आढळला नसल्याचे दिसून आले आहे.
बीसीजीची लस देशात प्रत्येक बालकाला दिली जाते. टीबीला दूर ठेवण्यास यामुळे मदत होते. यावर भारतीय वैज्ञानिक लक्ष ठेवून असल्याचे पब्लिक हेल्थ फाऊंडेशन ऑफ इंडिया ( PHFI) चे प्रमुख डॉ.के. श्रीनाथ रेड्डी यांनी सांगितले.