नवी दिल्ली : फॅशनच्या दुनियेत काय नवीन येईल, याचा नेम नाही. 'नाविन्यपूर्णत्वा'ला इथं सर्वात जास्त महत्त्व आहे. ब्रॅन्डची ओळखही यातूनच होते. मुंबईच्या एका 'ऑप्टोमेट्रिस्ट'नं एक पाऊल पुढे टाकत 'याअगोदर पाहिली नाही' (never seen before) अशी एक गोष्ट ग्राहकांसमोर आणलीय. डोळ्यांची सुंदरता वाढवण्यासाठी गोल्ड प्लेटेड कॉन्टॅक्ट लेन्सचा आविष्कार यांनी केलाय. फक्त सोनंच नाही तर चांदी आणि हिऱ्यांचाही वापर कॉन्टॅक्ट लेन्ससमध्ये केला जाऊ शकतो. फॅशनची आवड असणाऱ्या तरुणांमध्ये याची जबरदस्त क्रेझ आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतात सोन्याची मागणी प्रचंड आहे. कोणताही शुभ दिवस सोनं खरेदीविना पूर्ण होत नाही. भारत जगातील दुसरा सर्वात जास्त सोनं वापरणारा देश आहे. सोन्याची क्रेझ भारतीयांना इतकी आहे की अनेक लोक ज्वेलरीशिवाय सोन्याचे दातही लावण्यासाठी मागे-पुढे पाहत नाहीत. अनेक जण आपल्या कपड्यांसाठीही सोन्याचा वापर करतात. अशाच लोकांना डोळ्यांसाठीही सोन्याचा रंगाचा वापर करून डोळे सोनेरी होऊ शकतात, ही बातमी मोठा आनंद देऊ शकते. 



मुंबईच्या एका ऑप्टोमेट्रिस्टनं गोल्ड प्लेटेड कॉन्टॅक्ट लेन्सचा आविष्कार केलाय. या लेन्समध्ये थोडा सोन्याचा वापर करण्यात आलाय. या लेन्समध्ये सोन्याचं पाणी चारही बाजुंनी लावण्यात आलंय त्यामुळे या लेन्सेस सोन्यासारख्याच चमकतात. 


मी गेल्या चार वर्षांपासून गोल्ड कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर करतेय, परंतु मला आजपर्यंत कोणताही त्रास झालेला नाही. अनेक लोक या लेन्सेस वापरत आहेत, असं मुंबईची एक मॉडेल मृणाल गायकवाड हिनं म्हटलंय.


कदाचित जगात पहिल्यांदाच सोन्याचा वापर कॉन्टॅक्ट लेन्समध्ये केला जात असेल, असं डॉक्टर चंद्रशेखर छवन यांनी म्हटलंय. या सोन्याच्या कॉन्टॅक्ट लेन्सेसचं पेटंटही त्यांनी घेऊन ठेवलंय. या कॉन्टॅक्ट लेन्सची किंमत ११ हजार डॉलर अर्थात जवळपास ८ लाख रुपयांपर्यंत आहे. 


सोन्याशिवाय चांदी आणि हिऱ्यांचाही वापर कॉन्टॅक्ट लेन्सेससाठी करण्यात आलाय. ग्राहकांच्या आवडीनुसार ते आपल्या कॉन्टॅक्ट लेन्ससाठी काय वापरायचं याचा निर्णय घेऊ शकतात. तसंच आपल्याला हव्या तशा कस्टमाईज करू शकतात.