मौजमजा करताना ४ शाळकरी मुलांचा धरणात बुडून मृत्यू
सावगाव येथे तलावात बुडून चौघा मुलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. बेळगाव शहरापासून पाच किलोमीटरअंतरावर सावगाव आहे. आज बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली.
बेळगाव : सावगाव येथे तलावात बुडून चौघा मुलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. बेळगाव शहरापासून पाच किलोमीटरअंतरावर सावगाव आहे. आज बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. ईद ए मिलादनिमित्त शाळेला सुट्टी असल्याने ही शाळकरी मुले दुचाकीवरुन धरणावर आली होती. पाणी पाहून त्यांना पाण्यात उतरण्याचा मोह झाला. मात्र, त्यांना चांगले पोहता येत नसल्याने आणि पाण्याचा अंदाज न आल्याने ही मुले पाण्यात बुडालीत, अशी माहिती देण्यात येत आहे. दरम्यान, हे चौघेही दहावीचे विद्यार्थी होते. या चौघांपैकी एकाचा वाढदिवस असल्याने तो साजरा करण्यासाठी हे मित्र सावगावनजिकच्या धरणाकडे गेल्याचे सांगण्यात येत आहे.
चारही शाळकरी मुले दोन दुचाकीवरून सावगावनजिकच्या धरणाजवळ मौजमजा करण्यासाठी आली होती. यावेळी त्यांना पोहण्याचा मोह आवरता आला नाही. अंगावरील कपडे आणि बूट काढून धरणात उतरलेल्या त्या मुलांचा पाय घसरला आणि ती गटांगळ्या खात पाण्यात बुडाली. नजिकच्या शिवारात काम करणाऱ्या महिलांनी धरणाशेजारी ठेवण्यात आलेल्या दुचाकी आणि त्यावर ठेवलेले कपडे पाहिल्यानंतर त्यांना संशय आला. त्यांनी ही माहिती गावकऱ्यांना दिली. ग्रामस्थांनी पोलीस आणि अग्निशामक दलाच्या जवानांना ही माहिती दिली आणि शोध मोहीम हाती घेण्यात आली.
पोलीस आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी पाणबुड्यांच्या मदतीने मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास चौघांचे मृतदेह हाती लागलेत. साहिल युवराज बेनके (१५, राहणार रामघाट रोड, बेनकनहळी), चैतन्य गजानन भांदुर्गे, (१५, रा. भाग्यनगर, अनगोळ), अमनसिंह मुकेशसिंह, मुळचा उत्तर प्रदेश, सध्या राहणार गणेशपूर हिंडलगा आणि गौतम नितीन कलघटगी (१५, राहणार कोरे गल्ली, शहापूर) अशी मुलांची नावे आहेत.