Dominos Pizza Delivery : सहसा एखादा खाद्यपदार्थ आपण ऑनलाईन अॅपवरून मागवतो तेव्हा तिथं किमान डिलीव्हरीसाठी लागणारा वेळ साधारण 30 मिनिटे दाखवला जातो. काही Outlets तर अर्ध्या तासाहून कमी वेळात आम्ही पदार्थ तुमच्यापर्यंत पोहोचवतो अशी हमीही देतात. अशा या धावत्या जगात delivery boy ची प्रशंसा करावी तितकी कमीच. कारण, गल्लीबोळातून वाट काढत, मोकळ्या रस्त्यांवरून सुस्साट निघत ही मंडळी तुमचंआमचं पोट भरण्यासाठी जेवण वेळेत पोहोचवतात. अगदी जगाच्या कोणत्याही टोकावर आणि Traffic Jam असणाऱ्या कोणत्याही रस्त्यावर ही मंडळी वेळेतच येणार याची खात्रीच आहे. अतिशयोक्ती वाटतेय? तर आधी बंगळुरूमध्ये नेमकं काय घडलंय हे पाहून घ्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुळात असं काही घडू शकतं यावर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. पण, हे खरंय. एक्स युजर ऋषिवत्सनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळं घडला प्रकार समोर आला. जिथं हा युजर स्वत: बंगळुरूत वाहतूक कोंडीत अडकला होता. त्याचवेळी त्याला भूक लागली आणि मग काय करावं? शेवटी त्यानं पिझ्झा मागवला. वाहतूक कोंडीत अडकून पडलेलं असतानाच मोबाईलवरून त्यानं ऑर्डर प्लेस केली आणि त्यानंतर जे काही झालं ते पाहून हा युजर हैराणच झाला. 


अवघ्या 30 सेकंदांचा व्हिडीओ ऋषिवत्सनं शेअर केला. जिथं तो एका वरदळ असणाऱ्या वाटेमध्ये अडकला असून, आजुबाजूनं वाहनांचा आवाज आपल्याला तिथं नेमकी काय परिस्थिती असेल याचा अंदाज देत आहे. तितक्यातच तिथं दोन डिलीव्हरी बॉय येतात आणि क्षणाचाही विलंब न करता बॅगेतून पार्सलचे बॉक्स काढून  कारमध्ये असणाऱ्यांच्या हाती देतात. 


हेसुद्धा वाचा : कार घराजवळ अजिबात पार्क करू नका; इशारा देत KIA आणि Hyundai नं परत मागवल्या 35 लाख गाड्या 



आपल्यासोबत घडलेल्या या प्रसंगाविषयीचा व्हिडीओ पोस्ट करत त्यानं कॅप्शनमध्ये झाला संपूर्ण प्रकार शब्दांत मांडला. #Bengaluru #bengalurutraffic #bangaloretraffic अशा हॅशटॅगसह त्यानं ही पोस्ट शेअर केली. हा व्हिडीओ क्षणात व्हायरल झाला. एकिकडे अनेकांनी बंगळुरूतील वाहतूक कोंडीवर प्रतिक्रिया दिल्या, तर दुसरीकडे त्या डिलीव्हरी बॉयवर कौतुकाचा वर्षाव केला. किती कमाल असतं ना, त्या दोन अनोळखी चेहऱ्यांचं कौतुक आज इतके नेटकरी करत आहेत. सोशल मीडियाचीच ही कमाल म्हणावी!