Corona Positive : मोठी बातमी! चीनमधून भारतात परतलेल्या व्यक्तीला कोरोनाची लागण
भारतासाठी एक धक्कादायक आणि मोठी बातमी समोर आली आहे. चीनमधून 2 दिवसांपूर्वी भारतात आलेला एक व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) आढळला आहे.
Corona Positive : चीनमध्ये (China) सध्या कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. एका दिवसात चीनमध्ये 3 कोटी तर 20 दिवसात तब्बल 24 कोटी कोरोना (Corona) रुग्णांची नोंद चीनमध्ये झालीये. अशातच भारतासाठी एक धक्कादायक आणि मोठी बातमी समोर आली आहे. चीनमधून 2 दिवसांपूर्वी भारतात आलेला एक व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) आढळला आहे. हा व्यक्ती आग्रा इथे परतला. हा व्यक्ती चीनमधून आल्यानंतर कोरोना पॉझिटीव्ह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.
आग्रामध्ये 40 वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह आढळल्यानंतर त्याला त्याच्या घरीच अलगीकरण (Isolation) मध्ये ठेवण्यात आलं आहे. आग्र्यातील मुख्य वैद्यकीय अधिकारी अरुण श्रीवास्तव यांनी रविवारी याबाबत माहिती दिली. त्या व्यक्तीचा नमुना जीनोम सिक्वेन्सिंगसाठी लखनऊला पाठवण्यात येणार असल्याचं श्रीवास्तव यांनी सांगितले.
श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार, "ही व्यक्ती त्याच्या घरी आयसोलेशनमध्ये आहे. आरोग्य विभागाच्या टीमला त्याच्या कुटुंबातील सदस्यांची तसंच त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांची चाचणी करण्यास सांगण्यात आलं आहे."
मिळालेल्या माहितीनुसार, हा व्यक्ती 23 डिसेंबर रोजी चीनवरून दिल्ली मार्गाने अग्र्याला पोहोचला होता. ज्यानंतर त्याने लॅबमध्ये त्याची तपासणी करून घेतली. श्रीवास्तव यांनी सांगितलं की, या व्यक्तीचा कोरोना अहवाल आला असून त्याला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.
चीनमध्ये कोरोनाचा थैमान
झीरो कोव्हिड पॉलिसी शिथील केल्यानंतर चीनमध्ये परिस्थिती भयावह बनत गेली. पुढच्या 3 महिन्यात 60% नागरिकांना कोरोना होणार असल्याची भीती वर्तवण्यात येतेय. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाच्या बैठकीत कोरोनासंदर्भातली आकडेवारी ठेवण्यात आली होती. 20 मिनिटं चाललेल्या या बैठकीतली कागदपत्रं लीक झालीत. लोकांपर्यंत सत्य समोर येण्यासाठी कोण्या अधिका-याने ही माहिती लीक केल्याचा आरोप आहे. एका ब्रिटीश दाव्यानुसार चीनमध्ये रोज 5 हजार नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू होतोय, तर दरदिवशी 10 लाखांहून अधिक लोकं कोरोना पॉझिटिव्ह आढळत आहेत.
कोरोनाच्या रुग्णसंख्येवरुन चीननं पुन्हा लपवाछपवी सुरु केली
कोरोनाच्या रुग्णसंख्येवरुन चीननं पुन्हा लपवाछपवी सुरु केलीये. यापुढे चीनच्या आरोग्यविभागाला रुग्णसंख्या जाहीर करता येणार नाहीत असा निर्णय चिनी सरकारनं घेतलाय. चीनच्या रुग्णसंख्येची माहिती ही रोग नियंत्रण केंद्र म्हणजेच सीडीसीकडून जाहीर केली जाईल असं सांगण्यात आलंय. चीनच्या आरोग्य विभागाचा एक अहवाल लीक झाला होता. ज्यात एका दिवसात चीनमध्ये 3 कोटी नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचं उघडकीस आलं होतं त्यानंतर चीनी सरकारनं हा निर्णय घेतला आहे.