भारत बंद Live Update: राज्यभरात बंदला संमिश्र प्रतिसाद
देशभरात विरोधकांची भारत बंदची हाक
मुंबई : पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅस सिलेंडर भाववाढीच्या निषेधार्थ काँग्रेसतर्फे आज देशव्यापी भारत बंदची हाक देण्यात आली आहे. सकाळी ९ ते ३ वाजेपर्यंत महाराष्ट्रात हा बंद पाळण्यात येणार आहे. काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरुन नागरिकांना बंद पाळण्याचे आवाहन करत आहेत. मुंबईत देखील आंदोलनाला सुरुवात झालेली आहे.
Live अपडेट
- नाशिकमध्ये भारत बंदचे पडसाद उमटताना दिसू लागले आहेत. नाशिकच्या डोंगरे वसतिगृह येथे गणेश मूर्ती मार्केट भरविण्यात आले आहे. मात्र बंद मुळे आज या मार्केट मध्ये शुकशुकाट असल्याचे चित्र आहे. दोन चार ते पाच दिवसांपासून या मार्केट मध्ये गणेश मूर्ती खरेदी करण्यासाठी गणेश भक्तांची गर्दी होत होती मात्र आज सकाळपासून बंद असल्यामुळे शुकशुकाट पाहायला मिळत आहे. एकूणच आता या बंदचे पडसाद दिसू लागले आहेत.
- कल्याण डोंबिवलीत आज भारत बंदच्या पार्श्वभूमीवर सकाळी सात ते चार रिक्षा सेवा बंद ठेवण्यात आलीय. रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटनेनं सकाळीच भारत बंदमध्ये भाग घेण्याच्या निर्णय घेतलाय. त्यामुळे आज सकाळी अनेक प्रवाशांना पाय़पीट करत स्टेशन गाठावं लागलंय.
- आजच्या भारत बंदच्या पार्श्वभूमीवर वसईच्या माणिकपूर रस्त्यावर वाहनं थांबवायला सुरूवात झाली आहे. अनेक शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात रिक्षाही बंद आहेत.
- भारत बंदच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सर्वत्र पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आंदोलनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये, तसंच वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्याला पोलिसांचे प्राधान्य आहे. मुंबईतील महत्वाच्या ठिकाणी पोलिसांची जादा कुमक ठेवण्यात आली आहे.
- भारत बंदच्या पार्श्वभूमीवर आज एसटी बसेसचं होणारं नुकसान लक्षात घेता सकाळी ७ ते दुपारी ३ यावेळेत बहुतांश ठिकाणी बस सेवा बंद ठेवण्यात येणारय. पण दुपारी तीन नंतर राज्यभर बस सेवा सुरू होईल. त्यामुळे गणेशोत्सावासाठी कोकणात सोडण्यात येणाऱ्या ज्यादा गाड्या दुपारी तीन नंतर सोडण्यात येणार असल्याचं परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी स्पष्ट केलंय.
- मुलुंडमध्ये आंदोलकांनी एलबीएस मार्ग रोखला
- पश्चिम द्रुतगती मार्गावरील खेरवाडी जंक्शन येथे काँग्रेस कार्यकर्त्यांचा रास्तारोको, पोलीस आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये झटापट
- हुसेन दलवाई यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
- दादरमध्ये आंदोलकांची घोषणाबाजी, पोलिसांनी आंदोलकांना घेतलं ताब्यात
- काँग्रेस नेते अशोक चव्हाण आणि माणिकराव ठाकरे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
- अंधेरी स्थानकात काँग्रेस कार्यकर्त्यांचा रेल्वे रोखण्याचा प्रयत्न, काँग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष संजय निरुपम यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात.
- वाशी नाका आणि प्रतीक्षानगर डेपोच्या गेट जवळ बसवर दगडफेक.
- सायन प्रतिक्षानगर भागात बंद आंदोलनादरम्यान पोलिसांकडून काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड. पालिकेचे विरोधी पक्षनेते रवी राजासह अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात. एका बसवर दगडफेक
- नंदुरबार: भारतबंदला नवापूर, तळोदा, अक्कलकुवा, धडगाव तालुक्यात कडकडीत बंद. शहादा आणि नंदूरबार तालुक्यात संमिश्र प्रतिसाद. डाव्या पक्षाकडून नंदूरबारमध्ये रस्तारोको
- गोवंडीमध्ये नवाब मलिक आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
- मनमाडमध्ये बंदचा शाळा महाविद्यालयावर परिणाम नाही. बंदला व्यापारी वर्गाकडून प्रतिसाद.
- परभणी- भारत बंदमुळे अनेक शाळेच्या स्कुल बसेस बंद
- सातारा जिल्ह्यात बंदला चांगला प्रतिसाद. शाळा, महाविद्यालये आणि बससेवा सुरू.
- बीड - भारतबंदमध्ये बहुतांश शाळा आणि महाविद्यालये बंद, व्यापरपेठा, पेट्रोलपंप, बसस्थानकावर शुकशुकाट
- लातूर - शहर आणि जिल्ह्यातील अनेक भागात कडकडीत बंद, शहरातील अनेक शाळा महाविद्यालये सुरू आहेत. सर्वसामान्य नागरिकांना बंदचा त्रास होऊ न देण्याचे आ.अमित देशमुख यांचे आवाहन
- काँग्रेससह बंदला एकूण 21 पक्षांचा पाठिंबा.