नवी दिल्ली : उत्तर भारतातील बहुतांश राज्यात सवर्णांच्या संघटनांनी पुकारलेल्या बंदमुळे सामान्य जनजीवन ठप्प झाले आहे. अॅट्रोसिटी कायद्यातल्या कठोर तरतुदींविरोधात सवर्ण संघटना आक्रमक झाल्या आहेत. कायद्यातल्या तरतुदींनुसार अॅट्रोसिटी कायद्यांतर्गत तक्रार केल्यास चौकशीशिवाय अटक करण्याची मुभा देण्यात आलीय. अशा अनेक जाचक अटींविरोधात हा बंद पुकारण्यात आला. दरम्यान, बंदला हिंसक वळण लागले आहे. अनेक ठिकाणी रेल्वे गाड्या रोखण्यात आल्यात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


पेट्रोल पंप बंद, शाळांना सुट्टी


उत्तरप्रदेशात या बंदमुळे जनजीवन विस्कळीत झालं. तर मध्यप्रदेशात सकाळी १० ते ४ पेट्रोलपंप बंद करण्यात आले. त्याचप्रमाणे संवेदनशील जिल्ह्यात शाळांना सुट्टी देण्यात आली. राजस्थानमधल्या विविध भागांतही बंद पाळला गेला. बिहारमधील नालंदात रास्ता रोको तसंच रेल रोको करण्यात आला. तर दुकानंही बंद ठेवली गेली. या बंदचा सर्वाधिक परिणाम मध्यप्रदेश आणि बिहारमध्ये पाहायला मिळाला. 



काँग्रेसकडून भारत बंद


दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या दरांवरून काँग्रेसने सरकारविरोधात एल्गार पुकारला आहे. त्यासाठी येत्या १० सप्टेंबरला काँग्रेसने भारत बंदची हाक देण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी गुरुवारी दिल्लीतील पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत. गुरुवारी देखील पेट्रोल २० पैशांनी आणि डिझेल २१ पैशांनी महागले. यामुळे लोकांमधील असंतोष आणखीनच वाढला आहे.