भारत गौरव ट्रेनमधील तब्बल 40 प्रवाशांना विषबाधा; पुण्याकडे येणाऱ्या रेल्वेत घडला प्रकार
Indian Railway : भारतीय रेल्वेसंदर्भातील मोठी बातमी. एकाच वेळी 40 प्रवाशांना विषबाधा झाल्यामुळं माजली खळबळ. पाहा कधी आहे या प्रवाशांची प्रकृती...
Indian Railway News : भारतीय रेल्वेकडून प्रवाशांना देशाच्या विविध भागांमध्ये प्रवास करण्याची मुभा दिली जाते. पण, याच रेल्वेनं प्रवास करत असताना एक अप्रिय घटना घडली आहे. चेन्नईहून पुण्याच्या दिशेनं येणाऱ्या भारत गौरव रेल्वेनं (Bharat Gaurav yatra train) प्रवास करणाऱ्या तब्बल 40 प्रवाशांना विषबाधा झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. प्रवाशांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांच्या उपचारासाठी तातडीनं पुणे रेल्वे स्थानकात व्यवस्था करण्यात आली. ज्यानंत ससून रुग्णालयात त्यांच्यावर पुढील उपचार करण्यात आल्याची माहिती समोर आली. प्रवाशांना अन्नातून विषबाधा झाल्याचं सांगण्यात येत असून, सध्या प्रवाशांची प्रकृती स्थिर असल्यामुळं यंत्रणांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.
चेन्नईहून या भारत गौरव यात्रा ट्रेनचा प्रवास पुण्याच्या रोखानं सुरु झाला होता. सध्या या ट्रेनमधील पॅन्ट्री सुविधा काढण्यात आली असली तरीही रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांसाठीच्या खाण्यापिण्याची सुविधा करण्यात आली आहे. पण, यादरम्यानच प्रवाशांना अन्नातून विषबाधा झाल्याची बाब समोर आली.
मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही रेल्वे पुणे स्थानकात आली. त्यावेळी प्रकृती अस्वास्थाची तक्रार करणाऱ्या प्रवाशांवर पुणे रेल्वे स्थानकातच प्रथमोपचार करण्यात आले. कालांतरानं त्यांना ससून रुग्णालयात पुढील उपचारांसाठी पाठवण्यात आलं. जिथं रुग्णांसाठी 40 बेडची सोय करण्यात आली होती. प्रवाशांना अन्नातून झालेल्या या विषबाधेमुळं पुन्हा एकदा रेल्वेमध्ये दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले.
हेसुद्धा वाचा : Weather Update : विदर्भ, मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत काय परिस्थिती?
प्रवाशांना शिळं अन्न?
बहुतांश लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमध्ये सध्या पॅन्ट्री सुविधा बंद करण्यात आली आहे. ज्या गाड्यांमध्ये पॅन्ट्री आहे तिथं स्वच्छतेचा अभाव आहे. तर, जिथं पॅन्ट्री नाही तिथं प्रवाशांसाठी पाकिटबंद खाण्याची सोय रेल्वे विभाग करतो. पण, बऱ्याचदा सकाळपासूनची खाण्याची पाकिटं सायंकाळी किंवा रात्री प्रवास करणाऱ्या प्रवाशांना देण्यात येतात. यामध्ये अनेकदा अन्नपदार्थ शिळे झाल्यामुळं ते खराब होण्याची शक्यता असते. आणि यातूनच अन्नातून विषबाधा होण्याचे प्रकार घडत असल्याची बाब रेल्वे प्रवासी संघ अघ्यक्षा हर्षा शाह यांनी प्रकाशात आणली. इतकंच नव्हे, तर रेल्वेकडून पुन्हा पॅन्ट्रीकार सुरु करण्यात याव्यात अशी मागणीसुद्धा त्यांनी केली.