नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी मोठा अपघात; पिकनिकला जाणाऱ्या 6 तरुणांचा भीषण मृत्यू
Jamshedpur Road Accident : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी झारखंडमध्ये झालेल्या अपघातात सहा तरुणांचा बळी गेला आहे. तर दोन तरुण गंभीररित्या जखमी झाले आहेत. भरधाल कारने पोलला धडक दिल्याने हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे.
Jamshedpur Road Accident : संपूर्ण देश नववर्षाच्या जल्लोषात स्वागत करत असतानाच एक दुःखद घटना समोर आली आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी झारखंडच्या जमशेदपूरमध्ये एका वेदनादायक रस्ता अपघाताची घटना घडली आहे. जमशेदपूरमध्ये पहाटेच्या सुमारास झालेल्या अपघातात एका कारचा अपघात झाल्याने सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. सहा जणांच्या मृत्यूच्या वृत्ताने शहरात शोककळा पसरली आहे.
जमशेदपूरच्या सरायकेला येथील आदित्यपूर बाबा कुटी येथील सहा तरुणांचा सोमवारी पहाटे झालेल्या भीषण रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना बिस्तुपूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत साई मंदिर गोल चक्कर जवळ घडली. इंडिगो कारमधून प्रवास करणारे आठ तरुण मरिन ड्राइव्हकडे जात असताना अनियंत्रित गाडीने खांबाला धडक दिली. या धडकेत वाहनात प्रवास करणाऱ्या आठ तरुणांपैकी पाच तरुणांचा जागीच मृत्यू झाला. इतर तीन तरुण गंभीर जखमी झाले. स्थानिक आणि पोलिसांच्या मदतीने जखमींना एमजीएम हॉस्पिटल आणि टीएमएच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे तीन जखमी तरुणांपैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
अपघात एवढा भीषण होता की, कारचा चक्काचूर झाला. यातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर एका तरुणाचा एमजीएममध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. दोन जखमी तरुणांमध्ये हर्ष कुमार झा आणि रवी झा यांचा समावेश आहे. त्यांना टीएमसीएच आणि स्टील सिटीमध्ये पाठवण्यात आले आहे, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये छोटू यादव, सूरज, मोनू आदींचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच बिस्तुपूर पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आणि जखमींना रुग्णालयात नेले. रस्ता अपघाताची माहिती मिळताच या तरुणांचे कुटुंबीयही आदित्यपूरहून बिष्टुपूरला पोहोचले आहे. मृतदेह पाहून कुटुंबीयांनी घटनास्थळी आणि रुग्णालय परिसरात हंबरडा फोडला.
पहाटे पाच वाजता सूरज नावाच्या तरुणाच्या गाडीतून सर्वजण पिकनिकला निघाले होते. ही कार सुरज चालवत असताना बिस्तुपूर चौकाजवळ गाडीचे नियंत्रण सुटले आणि आधी सर्कलला धडकून नंतर विजेच्या खांबाला धडकून झाडाला धडकली. सकाळी झालेल्या अपघातानंतर त्या परिसरात एकच गोंधळ उडाला. बिस्तुपूर पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचले. मृतदेह कारमध्ये अडकला होते. तर जखमींना कसेबसे त्यांना बाहेर काढून टाटा मुख्य रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.