मुंबई : Petrol Price Today: वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्लीतील अरविंद केजरीवाल सरकारने मोठा निर्णय घेत राज्यातील पेट्रोलवरील व्हॅट कमी केला आहे. त्यामुळे दिल्लीत पेट्रोल 8 रुपयांनी स्वस्त झाले आहे.  (Delhi Petrol Price) नवीन दर आज रात्रीपासून लागू होणार आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात पेट्रोल कधी स्वस्त होणार, असा प्रश्न उपस्थित केला आहे. तर भाजपने दिल्लीचे उदाहरण देऊन महाविकास आघाडी सरकार दर कमी करणार का, असा सवाल केला आहे.


दिल्ली सरकारने घेतला मोठा निर्णय!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकारने पेट्रोलवरील व्हॅट (Value Added Tax) 30 टक्क्यावरून 19.40 टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. त्यामुळे दिल्लीत पेट्रोलची किंमत सध्याच्या 103.97 रुपयांवरून 95.97 रुपयांपर्यंत खाली येईल. दिल्ली सरकारने आज कॅबिनेट बैठकीत पेट्रोलवरील व्हॅट कमी करण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली आहे.


कॅबिनेट बैठकीत घेतला निर्णय


पेट्रोलवरील व्हॅट कमी करण्याच्या निर्णयाला दिल्ली सरकारने आज कॅबिनेट बैठकीत मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे दिवाळीच्या मुहूर्तावर केंद्र सरकारने उत्पादन शुल्कात पाच आणि दहा रुपयांची कपात करून जनतेला मोठा दिलासा दिला आहे. यानंतर अनेक राज्य सरकारांनी पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी केला. याच क्रमाने आज दिल्ली सरकारनेही हे पाऊल उचलले आहे.


सध्या दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 103.97 रुपये आहे. तर नोएडामध्ये पेट्रोलची किंमत 95.51 रुपये आणि गुरुग्राममध्ये 95.90 रुपये आहे. त्यामुळे बहुतांश ग्राहक यूपी आणि हरियाणाचे तेल भरण्यासाठी जात होते.


केंद्र सरकारचा दिलासा  


विशेष म्हणजे सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना दिलासा देत केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात अनुक्रमे पाच आणि दहा रुपयांनी कपात केली. त्यामुळे तेलाच्या किमती खाली आल्या. यानंतर अनेक राज्य सरकारांनी आपापल्या राज्यात पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी केला होता. यामध्ये पंजाब, राजस्थान आणि छत्तीसगडमधील काँग्रेस सरकारचाही समावेश आहे.


दरम्यान, पेट्रोलवरील व्हॅट कमी करण्याची मागणी महाराष्ट्रात भाजपने केली आहे. दिल्लीने व्हॅट कमी करुन सामान्यांना दिलासा दिला आहे. त्याप्रमाणे महाविकास आघाडी सरकारने व्हॅट कमी करुन पेट्रोलच्या किंमती कमी कराव्यात, अशी मागणी भाजपकडून आशिष शेलार यांनी केली आहे.