लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का; `या` नेत्याचा पक्षाला रामराम
अल्पेश ठाकोर हे राज्यातील ओबीसी समाजाचा प्रमुख चेहरा आहेत.
अहमदाबाद: लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही तास उरले असताना गुजरातमध्ये काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ओबीसी समाजाचे नेते अल्पेश ठाकोर लवकरच पक्षाला रामराम ठोकणार आहेत. अल्पेश हे सध्या अज्ञातवासात असून ते कोणाच्याही संपर्कात नाहीत. त्यामुळे अल्पेश ठाकोर पक्ष सोडण्याचा निर्णय घेणार असल्याची चर्चा आहे. अल्पेश यांनी आपल्या गटातील तीन आमदारांना काँग्रेस सोडण्याचे आदेश दिल्याचेही समजते.
२०१७ साली झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीवेळी अल्पेश ठाकोर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे गुजरातमध्ये काँग्रेसची ताकद वाढली होती. अल्पेश ठाकोर हे राज्यातील ओबीसी समाजाचा प्रमुख चेहरा आहेत. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर ते राधनपुर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते.
मात्र, अवघ्या वर्षभरातच अल्पेश ठाकोर यांचा भ्रमनिरास व्हायला सुरुवात झाली. काँग्रेसने मला आणि माझ्या समर्थकांना फसवले. आमची उपेक्षा होत आहे. गुजरात काँग्रेसची सूत्रे कमकुवत नेत्यांच्या हातात आहेत, असेही अल्पेश ठाकोर यांनी म्हटले होते. मात्र, यावेळी त्यांनी कोणाचाही स्पष्ट उल्लेख टाळला होता.
विशेष म्हणजे काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी अल्पेश ठाकोर यांच्याकडे सहप्रभारीपद दिले होते. मात्र, तरीही अल्पेश ठाकोर आणि काँग्रेसमधील दरी वाढतच गेली.