ATM मधून पैसे काढण्याचा बदलला नियम, जाणून घ्या
SBI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, बदलेला हा नियम तुम्हाला माहीत आहे का?
मुंबई: SBI ग्राहक असाल किंवा तिथे नवीन खातं उघडण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. याचं कारण म्हणजे SBI ने ATM मधून पैसे काढण्याच्या नियमात एक बदल केला आहे. ग्राहकांना ATM मधून पैसे काढण्यासाठी आता OTP लागणार आहे. ATM मधून पैसे काढताना तुम्ही रक्कम टाकल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल.
या ओटीपीच्या मदतीनेच आता तुम्ही पैसे काढू शकणार आहात. जर ओटीपी टाकला नाही तर पैसे काढता येणार नाही. ग्राहकांना यासाठी त्यांच्याकडे असलेला मोबाईल नंबर बँकेशी आणि ATM कार्डशी लिंक करावा लागणार आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाने ट्वीट करून यासंदर्भात माहिती दिली आहे. ट्विटमध्ये म्हटलं आहे की, 'एसबीआय ATM व्यवहारांसाठी OTP आवश्यक आहे. ग्राहकांना फसवणुकीपासून रोखणं ही आमची प्राथमिक जबाबदारी आहे. त्यामुळे ATM मधील व्यवहार सुरक्षित करण्यासाठी हा नवा नियम लावण्यात आला आहे.
ग्राहकांना फसवणुकीपासून सुरक्षित ठेवण्यासाठी SBI धारकांना ATM मधून पैसे काढण्यासाठी त्यांच्या मोबाईलवर एक OTP येईल. हा OTP तिथे टाकल्यानंतर पुढे प्रोसेस करता येणार आहे. ही सुविधा ग्राहकांच्या दृष्टीनं अधिक सुरक्षित करण्याचा बँकेचा प्रयत्न आहे. आपले कोणतेही डिटेल्स कोणालाही शेअर करू नयेत असा सल्लाही यावेळी बँकेच्या अधिकाऱ्यांनी ग्राहकांना दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार 10 हजार पेक्षा जास्त रक्कम ATM मधून काढायची असेल तर हा नियम त्या लोकांसाठी लागू असणार आहे. ATM मधून 10 हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम काढायची असेल तर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर OTP येईल. तो OTP दिल्यानंतरच ट्रान्झॅक्शन पूर्ण होणार आहे.