श्रीनगर : मागील काही काळापासून जम्मू काश्मीर भागात भारतीय जनता पक्षाच्या नेते आणि कार्यकर्त्यांवरील हल्ल्यांच्या प्रमाणात वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच आणखी एका धक्कादायक हल्ल्याची भर पडली आहे. ज्यामध्ये दहशतवाद्यांनी गुरुवारी सायंकाळच्या सुमारास कुलगाम येथे सलग तीन भाजप नेत्यांवर हल्ला केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे नेते त्यांच्या घराच्या वाटेवर असतानाच दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची खळबळजनक बाब समोर येत आहे. या हल्ल्यात तिन्ही नेते मंडळींचा मृत्यू झाला आहे. ज्यानंतर सदर परिसरात एकच गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं. पोलीस आणि लष्कराच्या जवानांनी घटनेची माहिती मिळताच तातडीनं घटनास्थळी धाव घेत शोधमोहिम सुरु केली. या हल्ल्यामुळं पुन्हा एकदा काश्मीर भागातील भाजप नेत्यांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. 


सूत्रांच्या माहितीनुसार भाजप युवा मोर्चाचे महासचिव फिदा हुसैन त्यांचे दोन सहकारी उमर रमजान आणि हारुन बेग यांच्यासोबत घराच्या दिशेनं निघाले होते. त्याचनेळी वायके पोरा भागात त्यांच्या वाटेवर असणाऱ्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला. हे दहशतवादी कोणा एका वाहनानं तिथवर आले होते. 



 


हल्ल्यानंतर दहशतवादी लगेचच पसार झाले. पोलीस घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी तिन्ही नेत्यांना रुग्णालयात दाखल केलं. पण, उपचारादरम्यान या तिघांचाही मृत्यू झाला. मागील काही महिन्यांमध्ये काश्मीर प्रांतात भाजप नेत्यांवरील दहशतवादी हल्ल्यांची अनेक प्रकरणं पाहायला मिळत आहेत. ज्यामुळं या भागात एकच भीतीची लाट पाहायला मिळत आहे.