Marathi : महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावेल अशी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी माणसासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. मराठी (Marathi) भाषेला अभिजात भाषेचा (Classical Language) दर्जा देण्यात आला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने (Cabinet Decision) याला मंजूरी दिली आहे. मराठी भाषेबरोबरच पाली, प्राकृत, असमिया आणि बंगाली भाषेलाही अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ही मोठी घोषणा केली आहे. याआधी तामिळ, संस्कृत, तेलगू, कन्नड, मल्यालम, ओडिया या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला होता. आता यात मराठी भाषेचाही समावेश झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे काय?


अभिजात भाषा हा वैशिष्ट्यपूर्ण भाषेला भारत सरकारद्वारे दिला जाणारा एक दर्जा आहे. केंद्र सरकारने अभिजात भाषेचे निकष ठरवलेले आहेत. हा दर्जा ज्या भाषांना दिला जातो त्या भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारकडून त्या-त्या राज्याला भरीव अनुदान मिळतं. देवेंद्र फडणवीस यांनी मानले आभार मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस! मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला.


मी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व सन्माननीय मंत्र्यांचे महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेच्या वतीने अतिशय मनापासून आभार मानतो. हा दिवस उजाडावा, यासाठी मी मुख्यमंत्री असताना आणि आताही मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्त्वात सातत्याने पाठपुरावा केला. लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, विवेकसिंधू अशा अनेक ग्रंथाचा आधार घेत मराठी भाषा ही अभिजातच आहे, हे सिद्ध करण्यासाठी अनेक थोरा-मोठ्यांचे, अभ्यासकांचे यासाठी हातभार लागले. मी त्यांचाही अत्यंत आभारी आहे.


अखेर आज तो सुदिन अवतरला. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मायमराठीचा हा बहुमान मनाला अतिशय सुखद अनुभूती देणारा आहे. महाराष्ट्रातील आणि जगभरातील तमाम मराठीजनांचे मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. मराठी भाषेच्या सर्वांगिण विकासासाठी आता अनुदानासह केंद्र सरकारच्या पातळीवर सुद्धा सर्व ते सहकार्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.


मराठी भाषेचा इतिहास


माझा मराठीची बोलू कौतुके, परि अमृतातेहि पैजासी जिंके....' असं मराठी भाषेचं वर्णन ज्ञानेश्वर माऊलींनी केलं आहे. मराठी भाषेला जवळपास 2000 वर्षांपूर्वीचा इतिहास असल्याचं सांगितलं जातंय. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी 2013 सालापासून प्रयत्न केले जात होतेय त्यासाठी रंगनाथ पठारे समिती स्थापन करण्यात आली होती.