बंगळूरू : कुन्नूरमध्ये झालेल्या भीषण हेलिकॉप्टर दुर्घटनेला जवळपास 90 तास उलटले आहेत. या अपघातात देशाने पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांच्यासह 13 शूरवीरांना गमावलं. या अपघातात फक्त एकच बचावले, ते म्हणजे ग्रुप कॅप्टन वरुण सिंग. कॅप्टन सिंग अजूनही रुग्णालयात असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संपूर्ण देश ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहे. ते लवकरात लवकर बरे व्हावे आणि त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळावा अशी प्रत्येकाची इच्छा आहे. याच दरम्यान त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती मिळाली आहे.


नाजूक आहे प्रकृती


ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांची प्रकृती अजूनही गंभीर आहे. कॅप्टन सिंग यांना बंगळुरूच्या कमांड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असून, त्यांच्यावर उपचार केले जातायत. हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, त्यांच्या तब्येतीत कोणतीही सुधारणा किंवा बिघाडही झालेला नाही. मात्र त्यांची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे.


तत्पूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कॅप्टन सिंग यांच्या कुटुंबीयांशी फोनवर चर्चा केली. संभाषणात त्यांनी कॅप्टन सिंग यांना सर्वोत्तम आरोग्य सुविधा देण्याबाबत संवाद साधला. या कठीण काळात संपूर्ण देश त्यांच्यासोबत असल्याचेही त्यांनी सांगितलं. 


कुटुंबीयांनी कॅप्टन सिंग यांच्यावरील उपचारांबद्दल समाधान व्यक्त केलं आणि ते लवकरात लवकर बरे होऊन परत येतील अशी त्यांना पूर्ण आशा आहे. त्याचबरोबर बंगळुरूच्या कमांड हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या कॅप्टन सिंग यांच्या प्रकृतीवर तज्ज्ञांची टीम सतत लक्ष ठेवून आहे.