पाटणा: मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात अपेक्षित वाटा न मिळाल्यामुळे नाराज झाल्याची चर्चा असलेल्या नितीश कुमार सरकारकडून रविवारी राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपच्या एकाही आमदाराला स्थान न देण्यात आल्याने नितीश कुमार यांनी केंद्रात मिळालेल्या वागणुकीचा वचपा काढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) काही आमदार लोकसभेवर निवडून गेल्याने त्यांच्या जागा रिक्त झाल्या होत्या. त्यामुळे हा मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला, असे 'जदयू'कडून सांगण्यात आले. यावेळी नीरज कुमार, संजय झा, रामसेवक सिंह, श्याम रजक, अशोक चौधरी, बीमा भारती, नरेंद्र नरायण यादव और लक्ष्मेश्वर राय यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. मात्र, यामध्ये भाजपच्या एकाही नेत्याला संधी न दिल्याने नितीश कुमार भाजपवर नाराज असल्याची कुजबूज सुरु झाली होती. 





मात्र, जदयूकडून हा दावा फेटाळण्यात आला. 'जदयू'च्या कोट्यातील जागा रिकाम्या असल्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला. आम्ही एनडीएतील घटकपक्षांशी चर्चा करुनच हा निर्णय घेतला. त्यावेळी आम्ही भाजपच्या कोट्यातील मंत्रिपदांसाठी ही नावे मागवली होती. मात्र, भाजपने तुर्तास ही मंत्रिपदे रिक्त ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आजच्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपच्या नेत्यांचा समावेश नव्हता, असे नितीश कुमार यांनी स्पष्ट केले. 


नुकत्याच झालेल्या मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात सहभागी होण्यास नितीश कुमार यांनी नकार दिला होता. लोकसभा निवडणुकीत जेडीयूने १६ जागा जिंकल्या आहेत. जेडीयूला केवळ एकच मंत्रीपद देण्याचे भाजपने निश्चित केल्याने नितीश कुमार कमालीचे नाराज झाले होते. त्यामुळे मोदी सरकारमध्ये न होता नितीश यांनी भाजपला प्रतिकात्मक संदेश दिल्याची चर्चा आहे.