स्वत:चे बॅंक डिटेल्स विकून करायचा लाखोंची कमाई; फसवणुकीची ही टेक्निक पाहून पोलिसही हैराण!
Selling Own Bank Details: आरोपी आपल्या मित्रांना स्वत:चे बॅंक अकाऊंट डिटेल्स विकायचा. त्यातून मित्र चांगली कमाई करायचे.
Selling Own Bank Details: चोरी, फसवणूक करण्यासाठी कोण काय शक्कल लढवेल हे सांगतात येत नाही. अनेकदा गुन्ह्याची उकल करताना पोलिसचं हैराण होऊन जातात. असाच काहीसा प्रकार समोर आलाय. ज्यामध्ये एका तरुणाने कमाई करण्यासाठी बॅंक अकाऊंट विकण्याचा प्रकार सुरु केला. तो आपल्या मित्रांना स्वत:चे बॅंक अकाऊंट डिटेल्स विकायचा. त्यातून मित्र चांगली कमाई करायचे. यात त्यालाही चांगले कमिशन मिळायचे. कसा चालायचा हा प्रकार? तुम्हाला काही अंदाज आला का? नसेल तर मग सविस्तर जाणून घेऊया.
महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी एका इसमाला अटक केली. पण त्याच्याकडून केलेल्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. तो स्वत:चे बॅंक डिटेल्स आपल्या मित्रांना शेअर करायचा. त्याचे मित्र लोकांची फसवणूक करण्यासाठी या बॅंक डिटेल्सचा वापर करायचे. यातून त्याला कमिशन म्हणून मोठी रक्कम द्यायचे. दिल्ली पोलिसांनी या घटनेची उकल केली आहे. त्यांनी गुन्हेगाराच्या घरी छापा मारला आणि त्याची चौकशी केली. यातून त्याने केलेला खुलासा आश्चर्यजनक होता.
एका महिलेची सोशल मीडियाच्या जाहिरातीतून फसवणूक झाली होती. आजारी नातेवाईकाला पैशांची गरज आहे, अशी जाहिरात तिने पाहिली होती. त्याला पैशांची गरज होती असे तो भासवत होता. यासाठी पैसे देण्याचे तो लोकांना आवाहन करत होता. महिलेला त्याच्यावर दया आली. मदत करण्याच्या हेतूने महिलेने त्याला आपला मोबाईल नंबर दिला. पण महिला ऑनलाइन फ्रॉडची शिकार बनली.
मदतीच्या बहाण्याने घ्यायचा क्राऊड फंडींग
गेल्यावर्षी 2 सप्टेंबरपासून या महिलेला अज्ञात नंबरवरुन सारखे फोन यायचे. माझ्या नातेवाईकांना पैशांची गरज आहे, असे फोन करणारा व्यक्ती सांगायचा. काही वेळाने तिला पुन्हा फोन आला आणि माझा मित्र रोशन कुमार शुक्ला लवकरच तुम्हाला फोन करेल असे त्याने सांगितले. काही वेळानंतर महिलेला दुसऱ्या मोबाईल नंबरवरुन व्हॉट्सअॅप कॉल आला. 3 डिसेंबर रोजी महिलेने 3 लाख रुपये कसेतरी गोळा केले आणि आरोपींच्या अकाऊंटला पाठवले. यानंतर मात्र आरोपींनी फोन बंद करुन ठेवला. पोलीस आयुक्त रोहित मीणा यांनी यासंदर्भात माहिती दिली.
36 लाख केले जमा
आपल्यासोबत फसवणूक झाल्याचे समजताच महिलेची झोप उडाली. यानंतर ती लगेच पोलिसांत गेली. ज्या अकाऊंटला पैसे पाठवले त्याचा तपशील तिने पोलिसांना दिला. दिल्ली पोलिसांनी बॅंक अकाऊंटचा तपास केला असता त्यावर वेगवेगळ्या अकाऊंटवरुन 36 लाख रुपये जमा झाल्याची माहिती समोर आली.
यानंतर बॅंक अकाऊंट होल्डरला ताब्यात घेण्यात आलं आणि त्याची कसून चौकशी करण्यात आली. आपण आपली बॅंक डिटेल्स मित्र शिवेंद्र कुमारला दिली होती. याबदल्यात मला दर महिन्याला कमिशन मिळायचे अशी माहिती आरोपीने दिली.
शिवेंद्रसोबतच त्याने आपला बॅंक तपशील मंटू ठाकूर आणि विकास ठाकूर यांनादेखील दिला होता. या माहितीनंतर शिवेंद्रला ताब्यात घेण्यात आले. यासोबतच तुषार कर्माकर, सागर कर्माकर, राहुल पात्रौ यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. तर मंटू आणि विकास ठाकूर अजूनही फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.