Bihar Crime : एकीकडे ओडिशातील (Odisha train accident) बालासोर येथे शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण रेल्वे अपघाताने (train accident) देश शोकसागरात बुडालेला असताना बिहारमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघातात 261 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे तर 900 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. दुसरीकडे काही तस्करांनी रेल्वेतील प्रवाशांवर हल्ला केला आहे. दारुची तस्करी (liquor smuggling) करताना हा सर्व प्रकार घडल्याचे म्हटलं जात आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिहारमध्ये दारूबंदी असूनही राज्यभर मद्य तस्करीच्या घटना सातत्याने समोर येत असतात. अशातच मद्याची तस्करी करणाऱ्या गुंडांनी थेट स्वतंत्र संग्राम एक्स्प्रेसवरच हल्ला केला.  पाटणाच्या ब्लॉक चौरस्त्याजवळील एका झोपडपट्टीत राहणाऱ्या सुमारे 200 लोकांनी झाशीहून कोलकात्याला जाणाऱ्या 22198 स्वातंत्र्य संग्राम एक्स्प्रेस क्रमांक या ट्रेनवर दगडफेक केली.


या ट्रेनच्या दोन डब्यांमध्ये काही लोक दारूची खेप घेऊन जात होते मात्र अचानक ते अडकले. यानंतर त्यांना सोडवण्यासाठी त्यांच्या साथीदारांनी ट्रेनवर दगडफेक केली. या घटनेत रेल्वेच्या अनेक बोगींच्या काचाही तुटल्या असून काही प्रवासी जखमीही झाले आहेत. सुमारे अर्धा तास चाललेल्या या गोंधळानंतर रेल्वे पोलिसांनी लोकांना तिथून हकलवून लावले. तुफान दगडफेकीमुळे ट्रेनच्या अनेक बोगींच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. यानंतर आरपीएफ जवानांनी रेल्वेच्या आत कोणी घुसू नये म्हणून सर्व बोगी आतून बंद करुन घेतल्या होत्या. त्यानंतर पाटणा जंक्शन येथून मोठ्या प्रमाणात पोलीस दल आणि आरपीएफ फौजफाटा मागवण्यात आला. 


नेमकं काय झालं?


झाशीहून हावड्याकडे जाणाऱ्या स्वतंत्र संग्राम एक्स्प्रेसच्या टॉयलेटमध्ये दोन तस्कर दारूची खेप लपवून घेऊन जात होते. बराच वेळ ते टॉयलेटमध्ये बसून प्रवास करत होते. मात्र टॉयलेटचा दरवाजा न उघडल्याने प्रवाशांचे हाल होऊ लागले आणि आतमध्ये काही तरी झाल्याची शंका त्यांच्या मनात निर्माण झाली. प्रवाशांनी आरपीएफच्या पथकाला याची माहिती दिली. त्यानंतर आरपीएफच्या जवानांनी शौचालयाचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, मात्र तस्करांनी आतून दरवाजा उघडला नाही. प्रसाधनगृहात गुन्हेगार लपल्याच्या भीतीने प्रवासी घाबरले आणि ट्रेनमध्ये एकच गोंधळ उडाला. त्याचवेळी आरोपींनी रेल्वेच्या बाजूला असलेल्या वसाहतीत त्यांचा सहकाऱ्यांना हा सर्व प्रकार सांगून मदत मागवली. स्वतंत्र संग्राम एक्स्प्रेस पाटण्यातील ब्लॉक चौकाजवळील झोपडपट्टीजवळ पोहोचताच तस्कराच्या सहकाऱ्यांनी तुफान दगडफेक सुरु केली. 


त्यानंतर रेल्वे पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने दगडफेक करणाऱ्यांना तिथून पळवून लावले. या सर्व प्रकारानंतर पोलिसांनी ट्रेनच्या टॉयलेटमधून दोन तस्करांना बाहेर काढून अटक केली. रेल्वेच्या टॉयलेटमधून आरपीएफने दारूची मोठी खेप जप्त केली आहे.