रिक्षाची बॅटरी संपली म्हणून पहिल्यांदा वाचला जीव, दुसऱ्यांदा मात्र... पतीच्या हत्येची पत्नीनं दिली सुपारी
Bihar Crime : बिहारमध्ये एका पत्नीने पतीची हत्या करण्यासाठी दीड लाख रुपयांची सुपारी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपींनी पतीची हत्या करण्याचा प्रयत्न केला पण सुदैवाने तो वाचला आहे. पोलिसांनी याप्रकरणातील सर्व आरोपींना अटक केली आहे.
Crime News : प्रेमप्रकरणातून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढत होताना दिसत आहे. अशातच बिहारमध्ये (Bihar Crime) एका महिलेने प्रियकाराच्या मदतीने पतीची हत्या केल्याचा प्रयत्न केला आहे. पत्नीने दीड लाख रुपयांची सुपारी देऊन पतीचा काटा काढण्याचा प्रयत्न केला आहे. पहिला प्रयत्न फसल्यानंतर पत्नीने पुन्हा कट रचत पतीला संपवण्याचा डाव आखला होता. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी (Bihar Police) या प्रकरणातील आरोपींना अटक केली आहे. तर जखमी पतीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
बिहारमधील जमुई जिल्ह्यात ई-रिक्षा चालकाच्या पत्नीने प्रियकरासह पतीच्या हत्येचा कट रचला होता. यानंतर शूटरला दीड लाख रुपये देऊन गोळी झाडण्यास सांगण्यात आले. लोकांनी ई-रिक्षा चालकाला जखमी अवस्थेत पाहिल्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी प्राथमिक उपचारानंतर पतीला पाटणा येथे हलवलं आहे. सध्या पोलिसांनी ई-रिक्षा चालकाच्या पत्नीसह त्याचा प्रियकर आणि अन्य आरोपींना अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 ऑक्टोबर रोजी ई-रिक्षा चालक राजा कुमार यांच्यावर हल्लेखोरांनी तीन गोळ्या झाडल्या होत्या. घटनेनंतर, गंभीर जखमी झालेल्या ई-रिक्षा चालकाला जमुई येथील रुग्णालयात नेण्यात आले. तिथे त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पाटणा येथे हलण्यात आले. सध्या जखमी राजा कुमार यांच्यावर पाटणा येथील पीएमसीएचमध्ये उपचार सुरू आहेत. पोलिसांनी याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक विशेष पथक स्थापन केलं होतं. विशेष पथकाने तीनच दिवसात या प्रकरणाचा उलघडा करत राजा कुमारच्या पत्नीसह पाच लोकांना अटक केली आहे.
राजाची पत्नी लक्ष्मी हिचे लग्नापूर्वीपासूनच अमित कुमारसोबत प्रेमसंबंध होते. लग्नानंतरही अमित लक्ष्मीला भेटायला घरी जात असे. राजाला याची काहीच कल्पना नव्हती. लक्ष्मीने आपल्या प्रियकरासह आपल्या पतीला मार्गातून काढण्याचा कट रचला होता. यानंतर लक्ष्मीचा प्रियकर अमितकुमार याने छोटू, सोनू आणि विष्णू यांना राजाला एक लाख चाळीस हजार रुपयांना ठार मारण्याची सुपारी दिला.
कसा केला हल्ला?
सुपारी घेतल्यानंतर आरोपींनी 23 ऑक्टोबर रोजी राजा यांची हत्या करण्याचे ठरवलं होतं. यासाठी छोटू कुमारने राजाला फोन करून त्याची ई-रिक्षा भाड्याने घेण्याचा प्रयत्न केला. छोटूने सांगितले होते की, मला खारगौरला जायचे होते आणि त्यासाठी ई-रिक्षा हवी होती, पण ई-रिक्षाची बॅटरी चार्ज होत नसल्याने त्या दिवशी ती मिळू शकली नाही. राजाने त्याच्याजागी मित्राला पाठवले. राजाच्या जागी कोणीतरी दुसऱ्यानेच ई-रिक्षा आणल्याचे पाहताच छोटू आणि त्याच्या साथीदारांनी ती परत केली. यानंतर, पुन्हा 24 ऑक्टोबर रोजी आरोपींनी राजाची ई-रिक्षा 600 रुपये भाड्याने बुक केली आणि छोटू ई-रिक्षात बसला. काही अंतर गेल्यावर त्यांनी ई-रिक्षा थांबवून त्याने राजा याच्या पाठीत तीन गोळ्या झाडल्या. यानंतर मागून दुचाकीवरून येणाऱ्या साथीदारांसह तो पळून गेला.
दरम्यान, छोटू ठाकूर उर्फ नामदेव, सोनू कुमार आणि विष्णू कुशवाह यांना अटक करुन त्यांच्याकडून घटनेत वापरलेली दुचाकी, पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे, मोबाईल फोन आणि 80 हजार रुपये रोख असा ऐवज जप्त करण्यात आला आहे. तर पोलिसांनी मरकट्टा येथून अमित कुमार ठाकूर आणि सिकंदरा येथून राजा कुमारची पत्नी लक्ष्मी देवी यांनाही अटक केली.