बिहार : बिहारमध्ये होळीच्या सणाला गालबोट लागलं आहे. राज्यातील तीन जिल्ह्यांमध्ये विषारी दारू प्यायल्याने 18 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. विषारी दारू पिल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापैकी 10 मृत्यू बांका जिल्ह्यात झाले आहेत. तर अनेक जण विषारी दारू पिऊन रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घटनेवर पोलीस प्रशासनाचं मौन
गावात आणि शहरात छुप्या पद्धतीने विकल्या जाणाऱ्या बनावट दारूमुळे हे सर्व मृत्यू झाल्याचं मृतांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. दुसरीकडे, बांका एसपी अरविंद कुमार गुप्ता यांचं म्हणणे आहे की, विषारु दारुमुळे मृत्यू झाल्याचं अजून स्पष्ट नाही, सध्या संशयास्पद आहे, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचं कारण स्पष्ट होईल असं पोलिसांचं म्हणणं आहे.


भागलपूरच्या नाथनगर भागातील साहेबगंज परिसरात होळीच्या दिवशी अनेक जण दारू प्यायले होते, असं तिथल्या लोकांचं म्हणणं आहे. या घटनेत संदीप यादव, विनोद राय, मिथुन कुमार, नीलेश कुमार यांचा मृत्यू झाला आहे. तर त्याच्यासोबत अभिषेक कुमार उर्फ ​​छोटू साह या युवकावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे.


तर भागलपूरच्या नाथनगर इथल्या साहेबगंज परिसरात होळीच्या दिवशी सकाळी काहीजण दारू प्यायले पण काही वेळाने त्यांची प्रकृती बिघडली. सर्व मृत एकाच गावातील आहेत. 


मधेपुरा जिल्ह्यातील मुरलीगंजमध्ये 4 जणांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. विषारी दारुमुळेच हे मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, मधेपुरा इथं होळीनिमित्ताने विषारी दारू प्यायल्याने २२ जण आजारी पडले आहेत. या सर्वांना मुरलीगंज पीएचसी आणि खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. 


दारूमुळे मृत्यू झाल्याचा पोलिस आणि कुटुंबीयांकडून इन्कार केला जात असला तरी पोलिसांनी तत्परतेने रात्रीच्या अंधारात मृतदेहांवर अंत्यसंस्कार केल्याचा आरोप केला जात आहे.