Teachers Punished By Salary Cut for Bed Performance: बिहारमधील जामुई जिल्ह्यात एक विचित्र घटना समोर आली आहे. येथील 13 शिक्षकांविरोधात शिक्षण विभागाने कारवाई करत पगारकपातीचा आदेश दिला आहे. हे 13 दोषी शिक्षक कामावर गैरहजर होते असं सांगत त्यांच्याविरोधातील कारवाईचं पत्र जारी करण्यात आलं आहे. मात्र या पत्रातील कारवाईपेक्षा त्यामधील एक स्पेलिंग मिस्टेकमुळे हे प्रकरण संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे. पत्रातील मजकुराप्रमाणे या 13 शिक्षकांवर कारवाई करत त्यांच्या 'बेड परफॉर्मन्स'साठी ही वेतनकपात केल्याचं म्हटलं आहे. या कारवाईच्या पत्रामध्ये बॅड म्हणजेच वाईट असं लिहिण्याऐवजी बेड असं चुकून छापून आल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. 'बॅड परफॉर्मन्स' ऐवजी 'बेड परफॉरमन्स' लिहिल्याने शिक्षक संघटनेनं नाराजी व्यक्त केली असून आंदोलनही केलं आहे. 


नेमकं घडलं काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

22 मे रोजी शिक्षक विभागाच्या अधिकाऱ्यांनी जामुई जिल्ह्यातील वेगवगेळ्या शाळांना अचानक भेट देत तेथील परिस्थितीची पहाणी केली. या पहाणीदरम्यान अनेक शिक्षक गैरहजर असल्याचं निदर्शनास आलं. तसेच जे हजर होते त्यांची कामगिरीही फारशी समाधानकारक नसल्याचा शेरा या तपास पथकाने दिल्याचं वृत्त 'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलं आहे. या पहाणी दौऱ्यानंतर स्थानिक जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी दोषी शिक्षकांविरोधात कठोर कारवाईचा निर्णय घेतला. त्यांनी यासंदर्भातील एक पत्र जारी करत शिक्षेची घोषणा केली. दोषी शिक्षकांना दंड ठोठावण्यात आला. मात्र या पत्रात नकळत एक फारच भयानक चूक झाली. या पत्रामध्ये शिक्षकांना त्यांच्या 'बेड परफॉरमन्स'साठी शिक्षा केल्याचं म्हटलं आहे.


पत्र व्हायरल झाल्यानंतर स्पष्टीकरण


या एका गंभीर चुकीममुळे हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं. अनेकांनी या पत्रावरुन शिक्षकांची आणि शिक्षण विभागाची खिल्ली उडवली. मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर आणि संपूर्ण जिल्ह्यात या पत्राची चर्चा असल्याने मुख्य शिक्षण अधिकाऱ्यांनी यावर स्पष्टीकरण जारी केलं. "बॅड परफॉरमन्स हे चुकून 'बेड परफॉरमन्स' असं लिहिलं गेलं. टायपिंगदरम्यान चूक झाल्याने हा गोंधळ घडला," असं स्पष्टीकरणामध्ये सांगण्यात आलं.


शिक्षकांच्या विश्वासार्हतेला धक्का


शिक्षक असोसिएशनने या प्रकरणी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. अशा चुकांमुळे विभागाच्या विश्वासार्हतेवर आणि शिक्षकांच्या प्रतिष्ठेला धक्का बसतोय, असं शिक्षकांच्या असोसिएशनने म्हटलं आहे. भविष्यात अशाप्रकारच्या चुका टाळल्या जातील असं आश्वासन प्रशासनाने शिक्षकांना दिलं आहे. कारवाई झालेल्या शिक्षकांना त्यांचा उर्वरित पगारही दिला जाणार असल्याचं शिक्षण विभागाने स्पष्ट केलं आहे.