Crime News : विद्यार्थ्यांना (Student) शिक्ष लागावी, चांगला अभ्यास करावा यासाठी शिक्षक (Teachers) नेहमीच प्रयत्नशील असतो. प्रसंगी विद्यार्थ्याने अभ्यास केला नाही किंवा मस्ती केली की शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षाही देतात. पण ही शिक्षा विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतेल इतकीही असू नये. अशीच एक धक्का घटना समोर आली आहे. एका शिक्षकाने विद्यार्थिनीला अशी शिक्षा दिली की ती पूर्ण करता करता ती विद्यार्थिनी बेशुद्ध पडली. त्या विद्यार्थिनीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिच्यावर आयसीयूत उपचार सुरु आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिहारमधल्या वैशाली (Vaishali, Bihar) जिल्ह्यातील महनार गावातील ही धक्कादायक घटना आहे. ट्यूशनला दांडी मारली म्हणून एका शिक्षकाने विद्यार्थिनीला कान पकडून उठा-बशा करण्याची शिक्षा दिली. शिक्षा पूर्ण करत असतानाच विद्यार्थिनी अचानक बेशुद्ध पडली. यानंतर तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मुलीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर आयसीयूत (ICU) उपचार करण्यात येत आहेत. प्रकरण समोर आल्यानंतर शिक्षण अधिकारी अहिल्या कुमारी यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. दोषी आढळ्यास शिक्षकाविरुद्ध कठोर कारवाईचे आदेशही देण्यात आले आहेत. 


पीडित विद्यार्थिनी हरगोविंदपूरमधल्या एका कोचिंग क्लासला शिकवणीसाठी जाते. या कोचिंग क्लासचे शिक्षक मनोरंजन यादव हे वैशाली जिल्ह्यातल्या एका कन्या शाळेत शिक्षक आहेत. याशिवाय ते स्वत:चा कोचिंग क्लासही चालवतात. पीडित मुलगी ही मनोरंजन यादव यांच्या कोचिंग क्लासमध्ये जाते. आजारी असल्याने तीने एक दिवस कोचिंग क्लासला दांडी मारली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा विद्यार्थिनी क्लासमध्ये पोहोचली, तेव्हा शिक्षक मनोरंजन यादव तिच्यावर चांगलेच संतापले. दांडी का मारली याचा जाब विचारत त्यांनी मुलीला उठा-बशा करण्याची शिक्षा दिली.


शिक्षक मनोरंजन यादव यांनी पीडित विद्यार्थिनीला कान धरून 100 उठा-बशा करण्यास सांगितलं. शिक्षकाच्या सांगण्यावर विद्यार्थिनीने उठा-बशा मारण्यासा सुरुवात केली. जवळपास 40 उठा-बशा तीने मारल्या. पण यानंतर ती दमली आणि जागीच चक्कर येऊन पडली. विद्यार्थिनीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मुलीची स्थिती पाहता तिला मोठ्या रुग्णालयात हलवण्यात आलं. 


पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार मुलगी एका इंग्लिश शाळेत सातव्या इयत्तेत शिकते. शाळा सुटल्यानंतर ती मनोरंजन यादव यांच्याकडे ट्यूशनला जाते. मुलीचा प्रकृती गंभीर असून तिच्यावर आयसीयूत उपचार सुरु आहेत. पीडित मुलीच्या वडिलांनी अद्याप याप्रकरणाची तक्रार पोलीस स्थानकात केलेली नाही. पोलस तक्रार करु नये यासाठी शिक्षकाकडून धमकावलं जात असल्याचं पीडित मुलीच्या वडिलांनी म्हटलं आहे. 


या प्रकरणाची माहिती शिक्षण अधिकारी अहिल्या कुमारी यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेतली. या प्रकरणाची सखोल चौकशी करुन शिक्षकाविरुद्ध कारवाईचे आदेश त्यांनी दिले आहेत.