COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी बिस्किट निर्माता कंपनी पारले प्रोडक्ट प्रायवेट लिमिटेड (Parle Products) आपल्या दहा हजार कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात करु शकते. मीडिया रिपोर्टनुसार, जर कंपनीच्या प्रोडक्ट विक्रीत घट झाली तर येणाऱ्या काळात काही कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. शंभर रुपये प्रति किलो किंवा यापेक्षा कमी किंमतीत विकल्या जाणाऱ्या बिस्किटांवरील जीएसटी कमी करण्याची मागणी करण्यात आली होती. सरकारतर्फे ही मागणी पूर्ण न झाल्यास आम्हाला कर्मचाऱ्यांमध्ये कपात करावी लागू शकते असे कंपनीतर्फे सांगण्यात आले आहे.


विक्रीत घट आल्याने नुकसान 


पारले जीच्या विक्रीत घट झाल्याने कंपनीला मोठे नुकसान झाले आहे. १०० रुपये किलोपेक्षा कमी विकल्या जाणाऱ्या बिस्किटांवरील कर कपातीची मागणी आम्ही सरकारकडे केली होती. या बिस्किटांची विक्री बाजारात ५ रुपये किंवा यापेक्षा कमी किंमतीत केली जाते. जर सरकारने हे मान्य केले नाही तर आमच्याकडे कर्मचारी कपातीशिवाय दुसरा पर्याय नसेल असे कंपनीचे मुख्य मयांक शाह यांनी म्हटले आहे. इकॉनॉमिक टाईम्समध्ये या संदर्भातील वृत्त देण्यात आले आहे.


१ लाखाहून अधिक कर्मचारी 


झी न्यूज डिजीटलने मयांक शाह यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण तो यशस्वी झाला नाही. लोकप्रिय ब्रॅण्ड पारलेजीमध्ये १ लाखाहून अधिक कर्मचारी काम करत आहेत. विविध शहरात कंपनीचे एकूण दहा प्लांट आहेत.