नवी दिल्ली: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशिवाय भाजपचे अस्तित्व शून्य आहे, असे वक्तव्य भाजपचे राज्यसभेतील खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्वामी यांचे हे वक्तव्य सूचक असल्याचे मानले जात आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नाते हे देशात कायमच चर्चेचा विषय राहिला आहे. संघ ही भाजपची मातृसंस्था असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. मात्र, भाजप किंवा संघाने आजपर्यंत ही बाब कधीच जाहीरपणे मान्य केलेली नाही. त्यामुळे यावरून कायम वादविवाद सुरु असतात. या पार्श्वभूमीवर सुब्रमण्यम स्वामी याने केलेल्या एका ट्विटमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. स्वामी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशिवाय भाजपचे अस्तित्व शून्य आहे. हे समजून घ्यायचे झाले तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे पॉवर प्लांट आहे आणि भाजपचे खासदार म्हणजे बल्बप्रमाणे आहेत. पावर प्लांटमधून निर्माण होणाऱ्या उर्जेमुळे बल्ब पेटतात, कधीतरी फ्युजही होतात. मात्र, याचा अर्थ असा होत नाही की, भाजपवर संघाचे नियंत्रण आहे. मुळात संघाचा विशाल दृष्टीकोन हा खूप जटील स्वरुपाच आहे. अनेक वर्षांच्या वाटचालीनंतर ही गोष्ट मला उमगली आहे. इतरांनी ती ध्यानात घ्यावी, असे स्वामी यांनी म्हटले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्वामींच्या या ट्विटवर अनेकांनी प्रश्नही उपस्थित केले. भाजप पक्ष संघाची साथ सोडून स्वबळावर वाटचाल करू शकतो का, असा प्रश्न एकाने त्यांना विचारला. त्यावर स्वामींनी 'अशक्य' असे उत्तर दिले. तर दुसऱ्या एका व्यक्तीने तुम्ही लोकसभा निवडणूक लढवणार का, असा प्रश्न स्वामींना विचारला. त्याला उत्तर देताना स्वामींनी म्हटले की, माझी इच्छा आणि अमित शहांचा विचार या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. 



भाजपकडून गुरुवारी लोकसभा निवडणुकांसाठी १८४ उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली. यामध्ये लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे सुब्रमण्यम स्वामींच्या वक्तव्याचे राजकीय वर्तुळात अनेक अर्थ काढले जात आहेत.