जम्मू : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक प्रचार सभेत काँग्रेसमुक्त भारत, असा नारा देत आले आहेत. मात्र, आज भाजपने आपल्या ताब्यातील राज्य स्वत: सत्तेतून बाहेर पडत गमावले आहे. त्यामुळे भाजपचा काँग्रेस मुक्तीच्या नाऱ्याचे काय, असा सवाल उपस्थित करण्यात आलाय. देशात भाजपच्या ताब्यात १९ राज्य होती. त्यातील एक राज्य आता कमी झालेय. म्हणजेच भाजपच्या ताब्यात १८ राज्य राहिली आहेत. दरम्यान, आता दोन राज्यांत निवडणुका होऊ घातल्या आहेत. भाजपविरोधी वातावरण तापविण्यात येत आहे. त्यामुळे मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील निवडणुकांकडे लक्ष लागले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रत्येक निवडणुकीनंतर भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या ताब्यातील राज्यांचा हिशेब नव्याने मांडला जातो. गेल्या काही निवडणुकांचे निकाल पाहता भाजप दिवसेंदिवस या उद्दिष्टाच्या अधिकाअधिक जवळ येत असल्याचे दिसत होते. मात्र, आज मंगळवारी भाजपने जम्मू-काश्मीर सरकारमधून स्वत:हून बाहेर पडत अनेकांना अनपेक्षित धक्का दिला. सत्ता मिळविण्यासाठी बाजी पणाला लावणाऱ्या भाजपवर सत्ता सोडण्याची वेळ आली. त्यामुळे त्यांचा हा निर्णय धक्कादायक मानला जात आहे. 


काही महिन्यांपूर्वी ईशान्य भारतातील त्रिपुरा आणि नागालँड या दोन राज्यांमध्ये भाजपचा झेंडा फडकला. त्यावेळी  देशातील १९ राज्यांमध्ये भाजप सत्तेत होती. त्यानंतर, मेघालयमध्येही नॅशनल पीपल्स पार्टीसोबत त्यांनी सत्ता स्थापन केली आणि २०चा आकडा गाठला होता, पण तेलुगु देसम राओलातून बाहेर पडल्याने आंध्र प्रदेशमधील सत्तेतून ते बाहेर गेले. नुकत्याच झालेल्या कर्नाटक निवडणुकांमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरुनही काँग्रेसच्या चलाकीमुळे भाजपला सत्तेपासून दूर राहावे लागले होते. मात्र, भाजपच्या मुख्यमंत्र्यांना बहुमत सिद्ध करण्याआधीच राजीनामा द्यावा लागला.


कर्नाटक निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मोदींनी काँग्रेस आता फक्त 'पीपीपी' पक्ष ठरेल, अशी खोचक टीका केली होती. पंजाब, पाँडेचरी आणि परिवार असा पीपीपीचा फुलफॉर्म मोदींनी सांगितला होता. परंतु कर्नाटकमध्ये काँग्रेसने राजकीय जुळवाजुळव करून सत्ता राखण्यात यश मिळवले. दरम्यान, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, झारखंड, आसाम, हरियाणा, छत्तीसगड, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, गोवा, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, नागालँड, त्रिपुरा, मेघालय आदी राज्य भाजपकडे आहेत.


तर काँग्रेसची सत्ता असलेली तीन राज्यं आहेत. यात पंजाब, मिझोरम, पद्दुचरीचा समावेश आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस, तामिळनाडू, ओडिशा, तेलंगणा, केरळ, दिल्लीत आपचे सरकार आहे. आंध्र प्रदेश, सिक्कीम अन्य पक्षांचे आहे.