चंदीगढ: महाराष्ट्रातील सत्तावाटपात शिवसेनेशी कोणत्याही प्रकारची तडजोड करायला नकार देणारा भाजप पक्ष हरियाणातील मित्रपक्ष असलेल्या जननायक जनता पार्टीवर (जेजेपी) भलताच खुश असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच हरियाणा सरकारच्या मंत्रिमंडळात जेजेपीला ११ खाती देण्यात आली आहेत. यामध्ये उत्पादन शुल्क, उद्योग, कामगार, नागरी उड्डाण, लोक निर्माण, विकास आणि पंचायत, पुरातत्व संग्रहालय, मदत आणि पुनर्वसन या महत्त्वाच्या खात्यांचा समावेश आहे. याशिवाय, जेजेपीच्या दुष्यंत चौटाला यांना यापूर्वीच उपमुख्यमंत्रीपदही देण्यात आले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या समन्वय समितीची पहिली बैठक


विशेष म्हणजे हरियाणा विधानसभा निवडणुकीत जेजेपीने अवघ्या १० जागा मिळवल्या होत्या. मात्र, त्रिशंकू परिस्थितीमुळे जेजेपीचे दुष्यंत चौटाला किंगमेकर ठरले होते. यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी चंदीगढमध्ये ठाण मांडून जेजेपीला भाजपसोबत येण्यासाठी राजी केले होते. अवघ्या दोन दिवसांत अमित शहा यांनी हरियाणातील सूत्रे हलवली होती. 


मात्र, महाराष्ट्रात भाजपने ५६ जागा मिळवणाऱ्या शिवसेनेशी कोणतीही तडजोड करण्यास नकार दिला आहे. शिवसेना आणि भाजप यांची तब्बल ३० वर्षांपासून युती होती. तरीही भाजपने शिवसेनेची अडीच-अडीच वर्षांची मुख्यमंत्रीपदाची मागणी फेटाळून लावली होती. त्यामुळे शिवसेनेने 'रालोआ'तून बाहेर पडत भाजपशी सर्व संबंध तोडून टाकले होते. हा वाद विकोपाला पोहोचल्यामुळे राज्यात सरकार स्थापन होऊ शकले नव्हते. याची परिणती राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्यात झाली होती. 


अमित शाहांनी बंद दाराआडचं मोदींना सांगायला हवं होतं- संजय राऊत


हरियाणा आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल एकाच दिवशी लागला होता. मात्र, हरियाणात दिवाळीच्या काळातच सरकार स्थापन झाले होते. तर महाराष्ट्रात २० दिवस उलटून गेल्यानंतरही सत्तास्थापनेचा तिढा कायम आहे.