मुंबई :  राज्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) विरूद्ध भाजप (BJP) हा संघर्ष टिपेला पोहचलाय. अशातच केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या (Union Minister Narayn Rane) वक्तव्यानं राज्याचं राजकारण पुरतं ढवळून निघालंय. नव्या वर्षात भाजप सत्तेत येईल असं भाकित राणेंनी केलंय. जयपूर दौऱ्यादरम्यान नारायण राणे यांनी हे विधान केलं. (BJP government will come to maharashtra in March 2022 says Union Minister Narayan Rane)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाविकास आघाडी सरकारला राज्यात दोन वर्षं पूर्ण होत असतानाच भाजपला पुन्हा एकदा सत्तांतराचे वेध लागलेत. सत्तातरांच्या मुद्याला यावेळी हवा दिलीय ती केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी. मार्चमध्ये राज्यात भाजपचं सरकार येईल असं भाकित नारायण राणेंनी वर्तवलंय.



दिल्लीतही राजकीय घडामोडींना वेग आलाय. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी दिल्लीत पक्षश्रेष्ठीं भेट घेतली. विशेष म्हणजे गुरूवारी चंद्रकांत पाटलांनी अमित शाहांची भेट घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी दुसऱ्या दिवशी अमित शाहांची स्वतंत्रपणे भेट घेऊन चर्चा केली. 


दुसरीकडे राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल हे देखील दिल्लीत आहेत. त्यामुळे राणेंचं वक्तव्य आणि दिल्ली दरबारी सुरू असलेली खलबतं यावरून राजकीय वर्तुळात तर्क वितर्कांना वेग आलाय. महाविकासआघाडीच्या मंत्र्यांनी मात्र सत्तांतराची शक्यता फेटाळून लावलीय. 


आर्यन खान प्रकरण, वानखेडेंवरील आरोप, गृहमंत्री अनिल देशमुख यांची अटक, राज्यभरात ईडी आणि आयटीचे छापे यामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यातलं वातावरण ढवळून निघालंय. महाविकास आघाडी सरकारला दोन वर्ष पूर्ण होत असताना या सर्व घडामोडींमुळे पुन्हा एकदा सत्तांतराची चर्चा सुरू झाली आहे.