भाजपकडून धोका, माझी हत्या होऊ शकते - अरविंद केजरीवाल
अरविंद केजरीवाल यांचा भाजपवर गंभीर आरोप.
नवी दिल्ली : लोकसभा २०१९ च्या निवडणुकीचा अंतिम टप्पा अर्थात सातव्या टप्यात मतदान होत आहे. या मतदानाच्या पूर्वसंध्येला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर गंभीर आरोप करुन राजकीय वर्तुळात भूकंप घडवून आणलाय. देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याप्रमाणेच माझा 'पर्सनल सिक्युरिटी ऑफिसर' (पीएसओ) माझी हत्या करू शकतो, माझे आयुष्य दोन मिनिटांत संपू शकते, असे धक्कादायक विधान केजरीवाल यांनी केले आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनीही ट्विट केले आहे. भाजप केजरीवाल यांची हत्या करु शकते.
माझ्या अवतीभवती जे सुरक्षारक्षक आहेत, ते सगळे भाजपला रिपोर्ट करतात. भाजपचे नेते माझ्या 'पीएसओ'करवी मला ठार मारू शकतात. माझ्या जिवाला त्यांच्यापासूनच धोका आहे, असे अरविंद केजरीवाल यांनी 'पंजाब केसरी' या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केले आहे. नरेंद्र मोदी आपली हत्या करवू शकतात, असा दावा केजरीवाल यांनी २०१६ मध्ये केला होता.
'आप' दिल्लीत सातही जागांवर बहुमताने विजयी झाले असते. मात्र, शेवटच्या दिवशी मुस्लिम समाजाने काँग्रेसला मतदान केले, असा दावा केजरीवाल यांनी केला आहे. त्यामुळे 'आप'ला आता सातही जागा जिंकता येणार नाहीत, अशी खंतही केजरीवाल यांनी व्यक्त केली. शेवटच्या दिवशी मुस्लिम मते फिरल्यामुळे आता 'आप'ला किती जागा मिळतील हे सांगता येणार नाहीत. तसेच या मतविभाजनाचा फायदा भाजपला होण्याचीही दाट शक्यता असे केजरीवाल म्हणालेत.