Murder of BJP Leader: मणिपूरमध्ये (Manipur) भाजपा (BJP) नेत्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. हत्येनंतर एका आरोपीने पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केलं असून दुसऱ्या आरोपीला अटक करण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. लैशराम रामेश्वर सिंग (Laishram Rameshwor Singh) असं या भाजपा नेत्याचं नाव आहे. ते पक्षाच्या राज्य विभागाच्या माजी सैनिक सेलचे निमंत्रक होते. त्यांच्या घराच्या गेटवरच हल्लेखोरांनी गोळ्या झाडून त्यांना ठार केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, दोन हल्लेखोर एका कारमधून आले होते. या कारवर रजिस्ट्रेशन नंबर नव्हता. सकाळी 11 वाजता त्यांनी लैशराम यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या असं पोलिसांनी सांगितलं आहे. 


50 वर्षीय लैशराम यांच्या छातीत गोळी लागली होती. जखमी अवस्थेत त्यांना एका खासगी रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र त्यांना मृत घोषित करण्यात आलं. हल्ल्याच्या काही तासातच कार चालवणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली. नरोम सिंग असं या आरोपीचं नाव आहे. 


दरम्यान मुख्य आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी मोठं सर्च ऑपरेशन सुरु केलं होतं. 46 वर्षीय केशोरजित याला पोलिसांनी आत्मसमर्पण करण्याचं आवाहन केलं होतं. तसंच त्याला लपण्यासाठी मदत करणाऱ्यांना इशारा देण्यातआला होता. यानंतर काही वेळातच आरोपीने इम्फाळमध्ये पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केलं. पोलिसांनी त्याच्याकडून एक परवाना पिस्तूल, दोन मॅगजिन आणि नऊ काडतूसं जप्त केली आहेत.


नरोम सिंग हा कार चालवत होता, तर केशोरजित याने लैशराम यांच्यावर गोळ्या झाडल्या अशी माहिती पोलीस अधिक्षकांनी दिली आहे. हत्येचं कारण विचारण्यात आलं असता त्यांनी यासंबंधी चौकशी सुरु असल्याचं सांगितलं आहे. भाजपाने या हत्येचा निषेध केला आहे. आरोपींविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी भाजपाने केली आहे.