नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या गेल्या पाच वर्षांतील कामगिरीच्या जोरावर भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी ( रालोआ) यंदाच्या निवडणुकीत २०१४ पेक्षाही मोठा विजय मिळवेल, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. ते गुरुवारी 'झी न्यूज'ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. जनतेने भाजपला पुन्हा सत्तेत आणायचे ठरवले आहे. त्यामुळे एनडीएला २७२ पेक्षा अधिक जागांवर विजय मिळेल, असे मोदींनी सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२०१४ च्या तुलनेत यंदा मोदी लाट नाही, या चर्चेविषयी मोदींना विचारणा केली असता त्यांनी म्हटले की, २०१४ मध्येही अनेकजण ही गोष्ट मान्य करायला तयार नव्हते. देशात मोदी लाट आहे, हे त्यांना मान्यच नव्हते. मात्र, प्रत्यक्षात वेगळेच घडले. आतादेखील त्याचीच पुनरावृत्ती होईल. मोदी सरकारने केलेल्या कामांवर जनतेचा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे २३ तारखेला खरे चित्र स्पष्ट होईल. मी प्रचाराच्यानिमित्ताने खूप ठिकाणी फिरलो आहे. त्यामुळे मला माहिती आहे की, देशातील लोकांना मजबूत सरकार हवे आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये आम्ही प्रत्येक राज्याला सोबत घेऊन काम केले आहे. त्यामुळे २०१४ मध्ये ज्या राज्यांमध्ये आम्हाला कमी जागा मिळाल्या होत्या, तिथेही आमचा आकडा वाढेल, असे मोदींनी सांगितले. 


'झी न्यूज'चे संपादक सुधीर चौधरी यांनी नरेंद्र मोदींची ही मुलाखत घेतली. यावेळी सुधीर चौधरी यांनी विरोधकांकडून सातत्याने करण्यात येत असलेल्या एका दाव्याविषयी नरेंद्र मोदी यांना विचारणा केली. २३ मे नंतर नरेंद्र मोदींचे पॅकअप होणार, असे विरोधक म्हणतात. जर खरंच अशी वेळ आली तर काय कराल, असा प्रश्न मोदींना विचारण्यात आला. त्यावर मोदी यांनी म्हटले की, अशीच वेळ आली तर मी माझी झोळी उचलून कधीही निघायला तयार असेन. मला जवळून ओळखणाऱ्यांना ही गोष्ट चांगली ठाऊक आहे. मात्र, मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो की, जनतेने भाजपच्या हातात पुन्हा सत्ता द्यायचे ठरवले आहे. त्यामुळे विरोधक काय विचार करतात, याकडे मी फारसे लक्ष देत नाही. मला जनतेवर पूर्ण विश्वास आहे. विरोधकांना हवी ती स्वप्नं पाहायला मोकळे आहेत. तुम्ही त्यांना आतापासून वास्तवाची जाणीव करून देऊन त्यांचा स्वप्नभंग करू नका, असा टोला मोदींनी लगावला.