जयपूर: गुजरातमधील विधानसभा निवडणुकीत दलित वर्गाची मते मिळवण्यासाठीच भाजपने रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपतीपदी बसवले, असा घणाघाती आरोप ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला. त्यांच्या या विधानामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने नुकतीच वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी आझम खान, योगी आदित्यनाथ, मेनका गांधी आणि मायावती यांच्यावर प्रचारबंदीची कारवाई केली होती. त्यामुळे आता जातीवाचक उल्लेखामुळे अशोक गेहलोतही निवडणूक आयोगाच्या रडारवर येण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुजरात विधानसभा निवडणुकांमुळे भाजपच्या तंबूत धावपळ उडाली होती. कारण गुजरातमध्ये भाजपची सत्ता येण्याची शक्यता दिसत नव्हती. त्यामुळेच त्यांनी या निवडणुकीत कोळी समाजाची मतं मिळावीत म्हणून भाजपने रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपती बनवलं. जातीय समीकरणाच्या हट्टापायी लालकृष्ण अडवाणी यांना डावलण्यात आल्याचा टोलाही गेहलोत यांनी भाजपला लगावला. 



अशोक गेहलोत हे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांचे उजवे हात समजले जातात. त्यामुळे आता निवडणूक आयोग गेहलोत यांच्यावर काय कारवाई करणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.