रामराजे शिंदे, झी मीडिया, नवी दिल्ली: शिवसेनेचे एकमेव केंद्रीय नेते अरविंद सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता भाजपने मोठा निर्णय घेतला आहे. सोमवारपासून दिल्लीत हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. यावेळी संसदेतील शिवसेना खासदारांची जागा बदलली जाऊ शकते. या खासदारांची रवानगी थेट विरोधी बाकांवर होऊ शकते, अशी चर्चा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यासंदर्भात 'झी २४ तास'ने लोकसभेतील शिवसेनेचे गटनेते विनायक राऊत यांच्याशी बातचीत केली. यावेळी विनायक राऊत यांनी म्हटले की, राज्यसभेत शिवसेनेच्या खासदारांची जागा बदलली जाणार असल्याची चर्चा माझ्याही कानावर आहे. मात्र, संसदेत शिवसेना खासदारांना अगदी कोपऱ्यात नेऊन बसवले तरी तेथूनही आम्ही आवाज उठवणारच, असे राऊत यांनी म्हटले. 


यावेळी विनायक राऊत यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) बैठकीला शिवसेनेला निमंत्रित न केल्याबद्दलही रोष व्यक्त केला. मुळात एनडीए ही बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारामुळे स्थापन झाली. त्या काळात शिवसेनेने साथ दिल्यामुळेच भाजपला आधार मिळाला. मात्र, आता भाजप NDA च्या निर्मात्यांनाच बाजूला ठेवत आहे. भाजपला या कर्माची फळ भोगावी लागतील, असा इशारा यावेळी राऊत यांनी दिला. 



काही दिवसांपूर्वीच भाजपचे सरचिटणीस राम माधव यांनीदेखील शिवसेनेला एनडीएचे दरवाजे कायमचे बंद झाल्याचे संकेत दिले होते. शिवसेना पुन्हा NDA मध्ये परतेल का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर राम माधव यांनी म्हटले की, शिवसेनेला भविष्यात NDA मध्ये सहभागी होण्यासाठी निमंत्रित केले जाण्याची शक्यता आता फारच कमी वाटते. शिवसेनेने आमच्या नेत्यांवर नाव घेऊन टीका करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मला पुन्हा समेटाची शक्यता दिसत नाही, असे राम माधव यांनी सांगितले होते.