कर्नाटकात सत्ता स्थापनेसाठी भाजपची दिल्लीत बैठक
कर्नाटकची सत्ता मिळवण्यासाठी भाजप काय योजना आखणार...
बंगळुरु : कर्नाटक निवडणुकीचा निकाल आल्यानंतर आता सरकार स्थापनेसाठी काँग्रेस-जेडीएस आणि भाजपमध्ये हालचाली सुरु झाले आहेत. काँग्रेस-जेडीएसने सरकार स्थापनेचा दावा केला आहे तर येदियुरप्पा यांनी राज्यपालांकडे सरकार स्थापनेसाठी 7 दिवसांची वेळ मागितली आहे. भाजपला काही जागांसाठी सत्ता हातातून जाण्याची भीती वाटत आहे. यामुळेच आता दिल्लीत भाजपच्या संसदीय कार्यकारिनीची बैठक होत आहे. भाजप अध्यक्ष अमित शाहांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होत आहे.
या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, सुषमा स्वराज, अरुण जेटली, नितीन गडकरी, थावर चंद गहलोत, शिवराज सिंह चौहान, जेपी नड्डा आणि रामलाल उपस्थित राहणार आहेत. कर्नाटकात सत्ता स्थापन करण्याच्या उद्देशाने ही बैठक असणार आहे.
भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस आणि जेडीएस एकत्र आले. इतर विरोधी पक्षांनी देखील भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी जेडीएसच्या नेत्यांशी चर्चा केली. पण आता भाजप काय करतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
कर्नाटकात काँग्रेसचं मोठं नुकसान झालं आहे. काँग्रेल 78 जागांवर आघाडीवर आहे. तर जेडीएस 38 जागांवर आघाडीवर आहे. भाजप कर्नाटकात सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. पण बहुमताच्या आकडा त्यांना गाठता आलेला नाही. त्यामुळे आता सत्ता मिळवण्यासाठी बैठकीत काय योजना आखली जाते याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे.