Maneka Gandhi: भाजप खासदार मेनका गांधी यांनी इंटरनॅशनल सोसायटी फ़र कृष्णा कॉन्शसनेस अर्थात इस्कॉनवर (ISKCON) गंभीर आरोप केले आहेत. मेनका गांधी (Maneka Gandhi) यांच्या वक्तव्याचे आता पडसाद उमटू लागले आहेत. इस्कॉन ही देशातील सर्वात मोठी फ्रॉड संस्था असल्याचं मेनका गांधी यांनी म्हटलंय. मेनका गांधी यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. इस्कॉन मंदिराकडू गोशाळेतील गायी कत्तलखान्यात विकल्या जातात असा आरोपही मेनका गांधी यांनी केला आहे. मेनका गांधी यांची प्राणी हक्कासाठी लढणाऱ्या अशी ओळख आहे. मेनका गांधी यांनी केलेल्या आरोपांना आता इस्कॉन संस्थेनेही चोख प्रत्युत्तर दिलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेनका गांधी यांचा व्हायरल व्हिडिओ
व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत मेनका गांधी इस्कॉन ही भारतातली आताची सर्वात मोठी फ्रॉड संस्था असल्याचं म्हटलं आहे. इस्कॉन संस्थेने गोशाळा उभ्या केल्या आहेत. यासाठी सरकारकडून त्यांना अनेक फायदे मिळतात. गोशाळेसाठी सरकारकडून मोफत जमीन दिली जाते असं मेनका गांधी यांनी म्हटलं आहे. यापुढे जाऊन त्यांनी सांगितलं, आंध्रप्रदेशमधल्या अनंतपूर गोशाळेच्या दौऱ्यात धक्कादायक चित्र पाहिला मिळालं. या गोशाळेत एकही दूध न देणारी गाय किंवा वासरु नव्हतं. सर्व दूध देणाऱ्या गायी होत्या. याचा अर्थ दूध न देणाऱ्या गायी विकल्या गेल्या आहेत. इस्कॉनकडून कत्तलखान्यात या गायी विकल्या जातात. 


इस्कॉन मंदिरवाले एकीकडे लोक 'हरे राम हरे कृष्ण' म्हणत श्रीकृष्णाचे गोडवे गातात. गाईच्या दुधावर संपूर्ण जीवन असल्याचा दावा ते करतात,  गायीची पूजा देखील ते करतात. पण गायी दूध देणं बंद झालं की त्याच गायी हे खाटीकाला विकल्या जातात. मेनका गांधी यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. मेनका गांधी यांच्या आरोपांना आता इस्कॉन संस्थेने उत्तर दिलं आहे. 


इस्कॉनचं उत्तर
मेनका गांधी यांच्या आरोपांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर इस्कॉन संस्थेने त्यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. मेनका गांधी यांनी केलेले आरोप पूर्णपणे खोटे आणि तथ्यहिन असल्याचं म्हटलं आहे. इस्कॉनचे प्रवक्ता युद्धिष्ठिर गोविंदा दास यांनी ट्विटरवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगात गाय आणि बैलांची देखभाल करण्यात इस्कॉन अग्रेसर आहे. इस्कॉनच्या गोशाळेत गायींची नैसर्गिक मृत्यूपर्यंत सेवा केली जाते असं युद्धिष्ठिर गोविंदा दास यांनी म्हटलंय. गायींना कधीही कत्तलखान्यात विकलं गेलं नाही आणि विकणार नाही, मेनका गांधी यांचे आरोप खोटे असल्याचंही युद्धिष्ठिर गोविंदा दास यांनी म्हटलंय. 


जगभरात इस्कॉन संस्थेकडून गायीची सेवा आणि संरक्षण केलं जातं. भारतात इस्कॉनकडून 60 हून अधिक गोशाळा चालवल्या जातात. या गोशाळेत शेकडो गायी आणि बैलांची रक्षा केली जाते. आयुष्यभर त्यांची काळजी घेतली जाते. कत्तलखान्यात पाठवल्या जाणाऱ्या किंवा जखमी गायींना इस्कॉनच्या गोशाळेत आणलं जातं, त्यांच्यावर उपचार करुन त्यांच सेवा केली जात असल्याचंही संस्थेने स्पष्ट केलं आहे.