खासदार नाना पटोलेंचा राजीनामा, भाजपला धक्का
गुजरात निवडणुकीच्या मतदानाआधी, भाजप सरकारमधील खासदाराने राजीनामा देणे, हे निश्चितच भाजपसाठी धक्कादायक आहे.
रामराजे शिंदे, झी मीडिया, नवी दिल्ली : देशात इतिहासात पहिल्यांदा सर्वात जास्त बहुमत घेऊन आलेल्या नरेंद्र मोदी सरकारमधील पहिल्या खासदाराने राजीनामा दिला आहे. गुजरात निवडणुकीच्या मतदानाआधी, भाजप सरकारमधील खासदाराने राजीनामा देणे, हे निश्चितच भाजपसाठी धक्कादायक आहे.
कृषी धोरणावर तीव्र नाराजी
नरेंद्र मोदी सरकारच्या कृषी धोरणावर तीव्र नाराजी व्यक्त करत नाना पटोले यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे.
नानांची नाराजी सतत धुमसत होती
नाना पटोले हे मागील अनेक दिवसांपासून भाजपच्या मोदी सरकारविरोधात नाराजी व्यक्त करत होते. नाना पटोले हे अनेकवेळा इतर पक्षाच्या नेत्यांशी भेटताना देखील दिसले, पण या भेटी हा योगायोग असल्याचं नानांकडून सांगण्यात येत होतं.
मोदींना मंत्री घाबरतात - नानांचं वादग्रस्त वक्तव्य
नाना पटोले यांनी सरकारविरोधातील वक्तव्य पुण्यात करताना म्हटलं होतं, मोदींना मंत्री घाबरतात, मात्र यावर दुसऱ्या दिवशीच नाना पटोले यांनी आपल्या वक्तव्याचा माध्यमांनी विपर्यास केल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं.
ना...ना म्हणणारे नाना पटोलेंचा अखेर राजीनामा
हे वक्तव्य सप्टेंबर २०१७ या महिन्यातील होतं, मात्र, २ महिन्यांनी नानांची नाराजी अनेक कारणांनी पुन्हा उफाळून आली आणि त्यांनी थेट खासदारकीचा राजीनामा दिला आहे.
प्रफुल्ल पटेलांना हरवणाऱ्या खासदाराचा राजीनामा
नाना पटोले हे महाराष्ट्रातून भंडारा-गोंदिया मतदारसंघातून नाना राष्ट्रावादीचे उमेदवार, आणि शरद पवार यांचे खंदे समर्थक, प्रफुल्ल पटेल यांना १ लाख ३८ हजार ८१८ मतांनी पराभूत करून विजयी झाले होते.