बुआ-भतिजाला हरवण्यासाठी भाजपचा `मंदिर प्लॅन`
या धर्मगुरु किंवा पुजाऱ्यांच्या माध्यमातून त्यांच्या अनुयायांपर्यंत पोहोचणे शक्य होईल.
लखनऊ: आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला पुन्हा सत्तेवर यायचे असल्यास उत्तर प्रदेशातील जनतेचा कौल मिळणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे भाजपने आत्तापासूनच उत्तर प्रदेशात रणनीती आखायला सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीत सपा आणि बसपच्या युतीमुळे भाजपला पराभवाचा मोठा धक्का बसला होता. त्यानंतर उत्तर प्रदेशातील राजकीय वर्तुळात अखिलेश यादव आणि मायावती हे बुआ-भतिजा समीकरण एकदम हिट ठरले होते. त्यामुळे भाजप खडबडून जागा झाला आहे.
या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकीसाठी भाजपने खास रणनीती आखली आहे. त्यासाठी भाजपने हिंदू मंदिरे, मठ आणि आश्रमांची मदत घ्यायची ठरवले आहे. या धार्मिक संस्थांच्या प्रमुखांशी संपर्क साधून भाजप आपला संदेश अप्रत्यक्षपणे मतदारांपर्यंत पोहोचवणार आहे. यासाठी भाजपने काही अर्ज तयार केले असून तब्बल दीड लाख बूथ प्रमुखांकडे ते सोपवण्यात आले आहेत. या अर्जात धार्मिक स्थळाचे नाव, ठिकाण, पुजारी आणि त्यांचा मोबाईल नंबर अशी माहिती भरायची आहे. जेणेकरुन या धर्मगुरु किंवा पुजाऱ्यांच्या माध्यमातून त्यांच्या अनुयायांपर्यंत पोहोचणे शक्य होईल. याचप्रकारे अनुसूचित जाती आणि ओबीसी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठीही रणनीती आखण्यात आली आहे.
यापूर्वी विधानसभा निवडणुकीत अमित शहा यांनी बूथ स्तरावरुन केलेल्या नियोजनामुळे भाजपला प्रचंड यश मिळाले होते. त्यामुळे पुन्हा एकदा अशीच रणनीती यशस्वी ठरेल, असा भाजपचा होरा आहे.