भोपाळ : मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) सध्या सुरू असलेल्या राजकीय नाट्यमय घडामोडींवर भाजपचे (BJP)  नेते आणि माजी मुख्यमंत्री  शिवराजसिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले, भाजपला मुख्यमंत्री कमलनाथ (Kamal Nath) सरकार पाडण्यात रस नाही. तो काँग्रेसचा अंतर्गत संघर्षातील पेचप्रसंग आहे. काँग्रेस (Congress) नेत्यांमधील संघर्षात काँग्रेसचे सरकार स्वत:च पडेल. सध्या मध्य प्रदेश राज्यात राजकीय पेचप्रसंगाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यावर शिवराजसिंह चौहान यांनी जास्त बोलण्यास नकार दिला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवराजसिंह चौहान पुढे म्हणालेत, ही काँग्रेसची अंतर्गतबाब आहे आणि मला यावर जास्त भाष्य करायला आवडणार नाही. आम्ही पहिल्याच दिवशी म्हटले होते की, आम्हाला सरकार पाडण्यात कोणताही रस नाही. दरम्यान, बंडाचा झेंडा फडकविणारे आमदार हे ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या गटाचे आहेत. त्यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत राजकारण असल्याचे बोलले जात आहे. ज्योतिरादित्य सिंधिया हे सरकार स्थापन होण्याआधीपासून नाराज होते. त्यांच्या समर्थकांना तेच मुख्यमंत्री व्हावे, असे वाटत होते. मात्र, काँग्रेस श्रेष्ठींनी कमलनाथ यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना मुख्यमंत्री केले. तेव्हापासून ज्योतिरादित्य सिंधिया हे नाराज आहे. त्यांची ही नाराजी ही बंडातून पुढे आल्याची चर्चा आहे.



सत्तास्थापनेपासून सुरु झालेली काँग्रेसची डोकेदुखी या बंडानंतर अधिकच वाढलेली दिसून येत आहे. मध्यप्रदेश सरकारमधले १७ आमदार हे बंगळुरु या ठिकाणी गेले आहेत. यामध्ये सहा विद्यामान मंत्र्यांचाही समावेश आहे. तसेच हे सगळे सिंधिया यांच्या गटाचे आहेत. त्यामुळे आता मध्यप्रदेशात राजकीय भूकंप होणार का, याचीच जोरदार चर्चा आहे. कमलनाथ यांच्याविरोधात ज्योतिरादित्य सिंधियांनी बंडाचा झेंडा उभारल्याची शक्यता आहे. त्यामुळे कमलनाथ सरकारला धोका जास्त आहे.



सरकारला धोका निर्माण झाल्याने दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली. तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह हेदेखील त्यांच्या भेटीला पोहोचले आहेत. दरम्यान भाजप सत्तेशिवाय राहू शकत नाही. १५ वर्षांत मध्य प्रदेशात त्यांनी जो भ्रष्टाचार केला तो समोर येणार आहे त्यामुळे ते अस्वस्थ झाले आहेत, अशी टीका कमलनाथ यांनी केली आहे.