नवी दिल्ली: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना रविवारी दिल्लीच्या एम्स रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. अमित शहा यांना स्वाईन फ्लू झाल्यामुळे रुग्णालयात भरती करण्यात आले होते. घरी आल्यानंतर अमित शहा यांना आणखी १५ दिवस वेगळ्या खोलीत ठेवण्यात येणार आहे. खासदार अनिल बलूनी यांनी ही माहिती दिली. आपणा सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे की भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची प्रकृती पूर्णतः सुधारली आहे. AIIMSमधून डिस्चार्ज घेऊन ते आपल्या निवासस्थानी परतले आहेत. बलुनी यांनी पार्टीचे कार्यकर्ते आणि शहा यांच्या शुभचिंतकांचे आभारदेखील व्यक्त केले आहेत, असे बलूनी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. १६ जानेवारी रोजी अमित शहा यांनी स्वत: ट्विट करून आपल्याला स्वाईन फ्लू झाल्याचे सांगितले होते. माझ्यावर उपचार सुरु असून आता माझी परिस्थिती चांगली असल्याचेही त्यांनी सांगितले होते. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमित शहा यांच्या आजारपणाच्या काळात काँग्रेसचे नेते हरिप्रसाद यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. कर्नाटकच्या शापामुळे अमित शहा यांना डुकराचा रोग झाला इथपासून ते अमित शहा वेगळ्याच कारणासाठी रुग्णालयात भरती झाल्याची वक्तव्ये हरिप्रसाद यांनी केली होती. एम्स रुग्णालयातील काहीजणांना मी ओळखतो. मला पूर्ण माहिती मिळाल्यानंतर मी सर्वांसमोर येईन, असा दावाही हरिप्रसाद यांनी केला होता. 


दरम्यान, या आजारपणामुळे अमित शहा रविवारी दिल्लीत होणाऱ्या भाजपच्या विजय संकल्प मेळाव्याला उपस्थित राहू शकणार नाहीत. अमित शहा यांच्याऐवजी भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवराज चौहान या कार्यक्रमाची सूत्रे सांभाळणार आहेत. यावेळी भाजप युवा मोर्चाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अनुराग ठाकुर, विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष पुनम महाजन आणि दिल्ली भाजपचे अध्यक्ष मनोज तिवारी कार्यकर्त्यांना संबोधित करतील.