नवी दिल्ली : मध्य प्रदेशमध्ये निवडणुकीसाठी काही दिवस बाकी आहेत. अशातच सगळे राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी जोर लावत आहेत. भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छिंदवाडामध्ये रॅली केली. तर पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी देखील चुरहटमध्ये सभा घेतली. यावेळी अमित शाहा यांनी काँग्रेसवर टीका केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेस खोटे आश्वासन देणारी एटीएम मशीन आहे. तर भाजप विकास आणि प्रगतीचं एटीएम आहे. अमित शाह यांनी काँग्रेसमध्ये वंशवाद आणि परिवारवाद असल्याची टीका केली. 1998 मध्ये सोनिया गांधी काँग्रेस अध्यक्ष बनल्या. त्यानंतर कोण अध्यक्ष होणार याबाबत सगळ्यांना माहित होतं. पण भाजपमध्ये असं होत नाही.


त्यांनी यावेळी लोकांना विचारलं की, 'जेव्हा मी अध्यक्षपदावरुन बाजुला होईल तेव्हा कोण भाजप अध्यक्ष होईल हे तुम्हाला माहित आहे? नाही. पण काँग्रेसमध्ये सोनिया गांधी यांच्यानंतर कोण अध्यक्ष होणार हे आधीच ठरलेलं होतं.'


स्वातंत्र्यानंतर नेहरू गांधी परिवारातील व्यक्तींनाच काँग्रेस अध्यक्ष केलं जात असल्याचा वादावर बोलत असताना भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी रविवारी म्हटलं की, 1978 मध्ये इंदिरा काँग्रेस बनल्यानंतर पक्षात वंशवादी सेवा सुरु झाली.


पंतप्रधान नरेंद्र मोदी मागील काही दिवसांपासून नेहरु गांधी परिवाराच्या बाहेरील व्यक्तीला काँग्रेस अध्यक्ष बनवण्याचा आव्हान काँग्रेसला देत आहेत. यावर प्रत्यूत्तर देतांना काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी चिदंबरम यांनी स्वातंत्र्यानंतर नेहरू गांधी परिवाराव्यतिरिक्त बनलेल्या 16 काँग्रेस अध्यक्षांची नावे सांगितली.