नवी दिल्ली: गेल्या काही काळात अनेक मित्रपक्षांनी भाजपची साथ सोडली आहे. आता यामध्ये आणखी एका पक्षाची भर पडली आहे. शिरोमणी अकाली दलाने दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपसोबत युती न करण्याचा निर्णय घेतला. अकाली दल आणि भाजप गेल्या २१ वर्षांपासून एकत्र आहेत. मात्र, नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या मुद्द्यावरून अकाली दलाने भाजपशी काडीमोड घेण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्ली शीख गुरुद्वारा प्रबंधक कमिटीचे अध्यक्ष मनजिंदर सिंह सिरसा यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. नागरिकत्व सुधारणा कायद्यात बदल झाल्याशिवाय आम्ही विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नाही. यापूर्वी दिल्ली विधानसभा निवडणूक भाजप व अकाली दलाकडून एकत्रपणे लढवली जात असे. मात्र, आम्हाला कोणत्या मुद्द्यावर बोलता येणार नसेल तर विधानसभा निवडणूक लढवण्यात अर्थ नाही, असे मनजिंदर सिंह सिरसा यांनी सांगितले. अकाली दलाचा कोणताही नेता अपक्षही लढणार नाही. तुर्तास केवळ निवडणूक एकत्र न लढण्याचा निर्णय झाला आहे. आता भाजप आणि अकाली दलाची युती कायम ठेवायची की नाही, याचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील, असेही सिरसा यांनी स्पष्ट केले. 


दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी ८ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तर ११ फेब्रुवारीला निकाल जाहीर होईल. दिल्ली विधानसभेच्या ७० जागा असून गेल्या निवडणुकीत दिल्लीत काँग्रेसला खातेही उघडता आले नव्हते. २०१४ मध्ये 'आप'ने जोरदार मुसंडी मारत ६७ जागा जिंकल्या होत्या. तर तीन जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आले होते.