जयपूर: मध्य प्रदेशात भाजपचे 'ऑपरेशन लोटस' यशस्वी ठरल्यानंतर आता राजस्थानमध्येही तशाचप्रकारच्या हालचाली सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. त्यासाठी केंद्रीय नेतृत्त्वाकडून सतिश पुनिया आणि राजेंद्र राठोड यांच्यावर विशेष जबाबादारी सोपविण्यात आली आहे. या दोन्ही नेत्यांकडून काँग्रेसच्या अनेक आमदारांना पक्ष सोडण्यासाठी २५ कोटी रुपयांची ऑफर देण्यात आल्याचा गौप्यस्फोट राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ते शनिवारी पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, सध्या आपल्याला कोरोनाविरुद्धच्या लढाईवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. मात्र, भाजप सध्या राजस्थानमधील सरकार अस्थिर करण्याच्या प्रयत्नात आहे. भाजपचे सतिश पुनिया आणि राजेंद्र राठोड हे केंद्रीय नेतृत्त्वाच्या सांगण्यावरून वेगवेगळे डाव टाकत आहेत. त्यांच्याकडून अनेक आमदारांना पैशाचे आमिष दाखवण्यात आले आहे. सुरुवातीला १० कोटी आणि सरकार पडल्यानंतर १५ कोटी रुपये दिले जातील, असे भाजप नेत्यांकडून सांगण्यात आल्याचा आरोप अशोक गेहलोत यांनी केला. 


 



भाजप देशाला काँग्रेसमुक्त करण्याची भाषा करत होता. मात्र, आता भाजपलाच काँग्रेसची भीती वाटू लागली आहे. राजस्थानमधील सरकार स्थिर असून ते पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल. सध्या आम्ही पुढील निवडणूक जिंकण्याची तयारी करत आहोत, असे गेहलोत यांनी म्हटले. अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात भाजप पक्ष असा नव्हता. २०१४ नंतर भाजपकडून अस्मिता आणि धर्माच्या आधारावर फुट पाडण्याचे राजकारण सुरु झाल्याचा आरोपही यावेळी गेहलोत यांनी केला.