नवी दिल्ली: भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी नाकारल्यानंतर आता अपेक्षेप्रमाणे विरोधकांनी टीकेला सुरुवात केली आहे. काँग्रेसचे नेते पी.एल. पुनिया यांनी यावरून नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्यावर जळजळीत शब्दांत निशाणा साधलाय. पुनिया यांनी म्हटले की, लालकृष्ण यांच्यासारख्या धुरंधर संसदपटूऐवजी अमित शहा यांच्यासारख्या तडीपार नेत्याला गांधीनगरमधून उमेदवारी देण्यात आली. भाजप पक्ष सध्या एका व्यक्तीच्या ताब्यात गेला आहे. भाजपची ही वाटचाल कोणत्या दिशेने सुरु आहे, हे जनतेला चांगलेच ठाऊक असल्याचे पुनिया यांनी म्हटले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपकडून गुरुवारी लोकसभा निवडणुकीसाठी १८४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये लालकृष्ण अडवाणी यांच्यासह पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना उमेदवारी देण्यात आलेली नाही. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा वाराणसीमधून लढणार आहेत. याशिवाय, भाजपचे राज्यसभेतील खासदार असणारे अमित शहा पहिल्यांदाच लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यांना लालकृष्ण अडवाणी यांच्या गांधीनगर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. गांधीनगर लोकसभा मतदारसंघ हा भाजपाचा बालेकिल्ला आहे. लालकृष्ण अडवाणी १९९१ मध्ये पहिल्यांदा या मतदारसंघातून निवडून आले होते. १९९६ साली अटलबिहारी वाजपेयी यांनीही या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यानंतर १९९८ पासून आत्तापर्यंत अडवाणी इथले खासदार आहेत.



नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी पक्षाची सूत्रे हाती घेतल्यानंतर लालकृष्ण अडवाणी यांच्यासह पक्षातील ज्येष्ठ मंडळींची रवानगी संसदीय मंडळात करण्यात आली होती. तेव्हापासून हे नेते पक्षातून बाजूला पडले होते. मात्र, आता या नेत्यांना उमेदवारीच नाकारण्यात आल्याने त्यांची राजकीय कारकीर्द संपण्याची चिन्हे आहेत. 


भाजपच्या अन्य ज्येष्ठ नेत्यांनीही यापूर्वीच लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. सुषमा स्वराज, उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री बी.एस. कोशियारी आणि बीसी खांडुरी, कलराज मिश्रा आणि सुमित्रा महाजन यांनी निवडणूक न लढवण्याची घोषणा केली होती.