कोलकाता : BJP and TMC MLA Rada : पश्चिम बंगालच्या विधानसभेत आमदारांचा राडा पाहायला मिळाला. भाजप-टीएमसीचे आमदार एकमेकांत भिडले. यावेळी दोन्ही राजकीय पक्षाच्या आमदारांनी एकमेकांचे कपडे फाडले. राड्यात काही आमदार जखमी झालेत. बीरभूम प्रकरणावरून विधानसभेत हाणामारी पाहायला मिळाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पश्चिम बंगाल विधानसभेत सत्ताधारी टीएमसी आणि भाजपच्या आमदारांमध्ये हाणामारी झाली. यावेळी सभागृहातील नेत्यांमध्ये जोरदार बाचाबाची आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. आमदारांनी विधानसभेच्या सभागृहातील दिवे तोडले.  रामपूरहाट हिंसाचार आणि पश्चिम बंगाल कायदा आणि सुव्यवस्था प्रकरणावर विधानसभेत चर्चा सुरू होती. यावेळी हा राडा पाहायला मिळाला.


विधानसभेत भाजप आमदार आणि विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी रामपूरहाट, बीरभूम घटनेवर चर्चेची मागणी करत होते. यानंतर भाजप आमदारांनी वेलमध्ये धरणे सुरू केले. विधानसभेत हे प्रकरण चांगलेच तापले आणि तृणमूल-भाजपचे आमदार एकमेकांना भिडले. हाणामारीत भाजपचे आमदार मनोज तिग्गा यांचे कपडे फाटले. दुसरीकडे, टीएमसी आमदार असित मजुमदार यांच्या नाकाला दुखापत झाली आहे. विधानसभा अध्यक्षांनी भाजपच्या अनेक आमदारांना निलंबित केले.


मुख्यमंत्री ममता रामपूरहाटला भेट देणार



बीरभूम हिंसाचारानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आज रामपूरहाटला भेट देणार आहेत. या प्रकरणावरून राजकारण तापले आहे. विधानसभेत भाजप आणि तृणमूलचे आमदार एकमेकांना भिडलेत. दरम्यान,  मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी बीरभूम हिंसाचार पीडितांची भेट घेणार आहेत. यासोबतच ममता सरकार या प्रकरणी उच्च न्यायालयाला स्टेटस रिपोर्ट देणार आहे.


बीरभूम हिंसाचार प्रकरणी उच्च न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेत घटनास्थळी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या सूचना दिल्या. पुराव्यांशी छेडछाड करू नये, असे न्यायालयाने म्हटले आहे. तसेच तपास अहवालही मागवला. विरोधकांबाबत बोलत भाजपचे शिष्टमंडळ काल बीरभूमला पोहोचले. त्याचवेळी राज्य सरकारने या घटनेचा एसआयटी तपास सुरू केला आहे.  


भाजपने स्थापन केली चौकशी समिती 


बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील रामपुरहाट भागात टीएमसी नेते भादू शेख यांच्या हत्येनंतर उसळलेल्या हिंसाचारात आठ जणांना जिवंत जाळणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. भाजपने या घटनेच्या चौकशीसाठी एक समिती स्थापन केली असून, ही समिती या घटनेची चौकशी करणार आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना अहवाल सादर करणार आहे. या अहवालाच्या आधारे भाजप बंगालमध्ये राष्ट्रपती राजवटीची मागणी करणार आहे.