कबड्डीच्या माध्यमातून युवकांशी जोडणार भाजप
देशात युवा मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. हे लक्षात घेऊनच प्रत्येक राजकीय पक्ष युवकांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच प्रमाणे आता भाजपने आपली नवी मोहीम सुरु केली आहे.
नवी दिल्ली : देशात युवा मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. हे लक्षात घेऊनच प्रत्येक राजकीय पक्ष युवकांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच प्रमाणे आता भाजपने आपली नवी मोहीम सुरु केली आहे.
राजस्थानमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुका लक्षात घेऊन भारतीय जनता पक्षाने बूथ स्तरावर कबड्डी स्पर्धांचे आयोजन केलं आहे. जेणेकरुन कबड्डीच्या माध्यमातून युवक भारतीय जनता पक्षासोबत जोडले जातील.
भाजपतर्फे बूथ स्तरावर पंडित दीनदयाल उपाध्या कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्याची योजना बनवत आहे. भाजप प्रत्येक ब्लॉकमध्ये कबड्डीच्या दोन-दोन टीम्स बनवणार आहे. त्यानंतर ब्लॉक, मंडल, जिल्हा आणि राज्यस्तरावर मॅचेसचं आयोजन करणार आहे.
भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आनंद शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानमध्ये जवळपास ५१ हजार बूथ आहेत. प्रत्येक बूथवर कबड्डीच्या दोन टीम्स बनवण्यात येतील. त्यानंतर जिल्हा स्तरावर येणाऱ्या दोन टीम्सला पक्षातर्फे ड्रेस देण्यात येईल.
ही स्पर्धा लवकरच सुरु करण्यात येणार असून जवळपास दिड महिन्यापर्यंत चालणार आहे. तसेच या स्पर्धेची फायनल मॅच जयपूरमध्ये खेळली जाणार आहे. मात्र, या स्पर्धेची तारीख अद्याप निश्चित करण्यात आलेली नाहीये असेही शर्मा यांनी सांगितले.
भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्याने सांगितले की, युवकांना खेळासोबत जोडण्यासाठी भाजपने या स्पर्धेचं आयोजन करण्याचं ठरवलं आहे. दरम्यान, यापूर्वी भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी आपल्या जयपूर दौऱ्यात स्थानिक ब्लॉक स्तरावर पक्षाला मजबूत करण्याचे आदेश दिले होते.