नवी दिल्ली : तीन राज्यांमधील पराभवानंतर भाजपसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. विरोधी पक्षाला वाटलं होतं की भाजपचा या ठिकाणी देखील ते सहज पराभव करतील. पण येथे सर्वच ठिकाणी भाजपचं कमळ फुललं आहे. हरियाणामध्ये झालेल्या 5 महापालिका आणि 2 नगरपालिका निवडणुकीत भाजपला मोठा विजय मिळाला आहे. 5 ही महापालिका निवडणुकीत भाजपचा विजय झाला आहे. हिसार, करनाल, पानीपत, यमुनानगर आणि रोहतक महापालिकेवर भाजपची सत्ता आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्य निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार यंदा या ठिकाणी 16 डिसेंबरला झालेल्या मतदानात 70 टक्के मतदान झालं होतं. या निवडणुकीत 734 उमेदवार निवडणूक लढवत होते. जवळपास 14 लाख मतदारांनी यंदा मतदान केलं.


हिसार, रोहतक, यमुनानगर, पानीपत आणि करनाल महापालिका आणि जाखलमंडी (फतेहाबाद) आणि पुंडरी (कॅथल) या दोन नगरपालिकेची निवडणूक 16 डिसेंबरला पार पडली होती. पहिल्यांदा येथे महापालिका महापौरांची थेट निवडणूक झाली.


नुकताच पार पडलेल्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला होता. राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड ही 3 मोठी राज्य भाजपला गमवावी लागली होती. काँग्रेसने येथे मोठं यश मिळवलं आहे. मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये 15 वर्षानंतर काँग्रेस सत्तेत आली आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल म्हणून या निवडणुकीकडे पाहिलं जात होतं. विरोधकांनी देखील मोदींची हवा संपल्याचा प्रचार सुरु केला आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मोदींना थेट आव्हान देण्यासाठी काँग्रेसकडून राहुल गांधींना पुढे केलं जात आहे.


काँग्रेस सोडून इतर विरोधी पक्षाने अजून पंतप्रधानपदासाठी राहुल गांधी यांचं नेतृत्व मान्य केलेलं नाही. भाजपविरोधी महाआघाडी झाली तरी पंतप्रधान कोण होणार या मुद्द्यावर आघाडीत बिघाडी होऊ शकते. 2019 च्या निवडणुकीत कोण सत्तेत येणार हे आता मतदारच ठरवतील. त्यामुळे त्या वेळेची वाट पाहावी लागेल.