नवी दिल्ली : भाजपने आपल्या नवीन केंद्रीय टीमची घोषणा केली आहे. यात महाराष्ट्रातील नेत्यांना संधी देण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी भाजपच्या केंद्रीय अधिकाऱ्यांची नावे जाहीर केली. यात पंकजा मुंडे, विनोद तावडे, विजया रहाटकर यांना संधी देण्यात आली आहे. तर खासदार पुनम महाजन यांना वगळण्यात आले आहे. त्यांच्याऐवजी तेजस्वी सू्र्या यांच्यावर युवा मोर्चाची जबाबदारी देण्यात आली आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपची राज्य कार्यकारीणी जाहीर करण्यात आली होती. प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही कार्यकारीणी जाहीर केली होती. या कार्यकारणीत पंकजा मुंडे, विनोद तावडे यांना संधी देण्यात आली नव्हती. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली होती. मात्र, चंद्रकांत पाटील यांनी पंकजा मुंडे, विनोद तावडे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली जाईल, असे सांगितले होते.


नाराज नेत्यांना  भाजपने राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी दिली आहे. पंकजा मुंडे आणि माजी मंत्री विनोद तावडे यांना भाजपने अखेर राष्ट्रीय स्तरावर संधी दिली आहे. या दोघांचीही भाजपच्या राष्ट्रीय सचिव पदी वर्णी लागली आहे. भाजपचे नाराज ज्येष्ठे नेते एकनाथ खडसे यांना मात्र यात स्थान मिळालेले नाही. त्यांची नाराजी दूर करण्यात आलेली नाही. त्यामुळे आता खडसे काय भूमिका घेतात याची उत्सुकता आहे. लवकरच आपण निर्णय घेणार असल्याचे खडसे यांनी जाहीर केले होते.


भाजपने महाराष्ट्रातून विजया रहाटकर, सुनील देवधर यांनाही राष्ट्रीय सचिव म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. तर अल्पसंख्याक मोर्चाच्या अध्यक्षपदी नागपूरचे जमाल सिद्धिकी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.