चेन्नई : भारतीय जनता पक्ष आणि सुपरस्टार अभिनेता रजनीकांत यांच्यात जवळीक वाढत असल्याचं पहायला मिळत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय जनता युवा मोर्चाच्या अध्यक्षा आणि खासदार पूनम महाजन यांनी रविवारी अभिनेता रजनीकांत यांची चेन्नईत भेट घेतली. या भेटीनंतर रजनीकांत यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा पून्हा एकदा सुरु झाली आहे. मात्र, या भेटीमागचं कारण हे राजकीय नसल्याचं भाजपच्या सूत्रांनी म्हटलं आहे.


रविवारी चेन्नईत पूनम महाजन यांनी रजनीकांत आणि त्यांची पत्नी लता यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. पूनम महाजन यांनी देखील ट्विटरवर या भेटीचे फोटो शेअर केले. सर्वात नम्र दाम्पत्याची भेट घेतली असेही पूनम महाजन यांनी फोटो शेअर करताना म्हटले आहे.



गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेता रजनीकांत यांनी राजकारणा प्रवेश करणार असल्याचे संकेत दिले होते. तेव्हापासून रजनीकांत भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा रंगल्या होत्या. रजनीकांत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काही दिवसांपूर्वी भेट घेतली होती तेव्हापासून विविध चर्चांना उधाण आले होते.


आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वी अभिनेता रजनीकांत यांच्या माध्यमातून भाजप तामिळनाडूत आपली पकड मजबूत करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. जयललितांच्या निधनानंतर अण्णाद्रमुकमध्ये पडलेली फूट तसेच करुणानिधींनी राजकारणातून घेतलेली निवृत्ती या परिस्थितीत अभिनेता रजनीकांत यांच्या माध्यमातून आपलं वर्चस्व निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.