अंध मुलांनी फुलांच्या गंध घेत साकारला तिरंगा
भगवा रंग म्हणजे झेंडू, सफेद म्हणजे मोगरा आणि हिरवा म्हणजे तुळस अशी रंग ओळख
वाडा : ७३ व्या स्वातंत्रदिनाचा उत्साह देशभरात पाहायला मिळतोय. या निमित्ताने शाळा, महाविद्यालय, सोसायटी, सरकारी कार्यालय अशा सर्व ठिकाणी तिरंगा फडकवून त्याला वंदन केले जाईल. वाडा, झाडपोळी येथील जिजाऊ सोशल ट्रस्टच्या ओमकार अंध आणि विशेष शाळेच्या विद्यार्थ्यांनी आगळ्यावेगळ्या पद्दतीने तिरंगा बनवला आहे. अंध मुलांनी फुलांच्या सुगंधाच्या आधारे तिरंग्यामध्ये फुलांचे रंग भरले. श्रीरंग संस्थेच्या पुढाकाराने आणि डॉ. सुमीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम घेण्यात आला. २५ अंध आणि विशेष विद्यार्थी यात सहभागी झाले होते.
भगवा रंग म्हणजे झेंडू, सफेद म्हणजे मोगरा आणि हिरवा म्हणजे तुळस अशी रंग ओळख करून विद्यार्थ्यांनी हा तिरंगा साकारला आहे. भारतात नेत्रदानाबाबत उदासिनता पाहायला मिळते. नेत्रदानाचे प्रमाण आपल्या देशात फार कमी आहे. यामुळे नेत्रदान करण्याचा संदेश अंध विद्यार्थ्यांनी यावेळी दिला. तसेच रक्षाबंधन दिनाच्या पार्श्वभूमीवर श्रीरंग संस्थेतर्फे या विद्यार्थ्यांना बोलीभाषेतील राख्या बांधण्यात आल्या.